ठाणे: कल्याण-डोंबिवलीत भंगारवाले शिरजोर झाल्याचा प्रकार नुकताच उजेडात आला आहे. भंगार विकत घेण्याच्या बहाण्याने सोसायटीत शिरलेल्या चोरट्याने अवजड लोखंडासह अन्य साहित्य उचलून तेथून काढता पाय घेतला. हा संपुर्ण प्रकार कल्याण पश्चिमेकडील एका सोसायटीच्या आवारात लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. डबा-बाटली भंगारवाला~असा आवाज देत भंगारवाले अनावश्यक सामान खरेदी करण्यासाठी सोसायटी आणि चाळवस्तीत फिरताना दिसून येतात. मात्र याच भंगारवाल्याच्या पेशाचा फायदा घेतल्याचे उघडकीस आले आहे. कल्याण पश्चिमेकडील बिर्ला कॉलेज परिसरात असलेल्या जितेश सोसायटीमध्ये भंगारवाल्याचा मुखवटा धारण करून घुसलेल्या चोरट्याने आपला कार्यभाग साधला. दुपारच्या सुमारास सर्वत्र निरव शांतता असल्याचा फायदा उचलून या चोरट्याने सोसायटीत शिरून आधी भंगार बाटलीवाले, असा आवाज दिला. या चोरट्याने आधी पूर्ण सोसायटीमध्ये रेकी केली. त्यानंतर बिनधास्तपणे सोसायटीत असलेल्या जिमचे साहित्य, बाथरूमचा लोखंडी दरवाजा, पाण्याच्या जुन्या मोटारपंपासह इतर हाती लागलेल्या लोखंडी वस्तू उचलून हा चोरटा निघून गेला. भंगारवाल्याच्या बुरख्याआड चोरट्याचे हे कृत्य सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सोसायटीतील रहिवाशांनी या चोरट्याच्या विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्याचा शोध सुरू केला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/DsCRopM
No comments:
Post a Comment