म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :टोमॅटोसह अन्य काही भाज्यांच्या दरवाढीने हैराण झालेल्या मुंबईकरांना हे भाव कमी होण्यासाठी सप्टेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे. सप्टेंबरमध्ये भाज्यांचे भाव कमी होऊन हिरव्यागार ताज्या भाज्यांची मुबलक उपलब्धता होण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत झालेला पाऊस, योग्यवेळी टोमॅटोचे उत्पादन न घेतल्याने बसलेला फटका आणि परराज्यांतून भाज्यांची आवक होण्यास या महिन्यात सुरुवात झाली की भाज्यांची पुरेशी उपलब्धता होऊन भावही खाली येतील असा विश्वास घाऊक व्यापारी व्यक्त करत आहेत.गेल्या काही दिवसांपासून कोबी, फ्लॉवर वगळता इतर भाज्यांचे दर हे किरकोळ बाजारामध्येही शंभर ते एकशेवीस रुपये किलोच्या घरात आहेत. टोमॅटोच्या दर्जानुसार त्याचा भाव हा शंभर रुपये अथवा त्यापेक्षा अधिक आहे. अनेक ग्राहकांनी त्यामुळे टोमॅटोसह महागड्या भाज्यांकडे पाठ फिरवली आहे. एपीएमसी बाजारातील रामदास कदम यांनी यासंदर्भात माहिती दिली. पावसाळ्यात भाजीची उपलब्धता, मुबलकता आणि मागणी-पुरवठ्याचे गणित असते. पावसाचे प्रमाण कमी झाले की ते बिघडते. यंदा काही भागात अजूनही समाधानकारक पाऊस झाला नसला तरीही भाजीपाल्याचा पुरवठा करणाऱ्या जिल्हांमध्ये भाज्यांची, टोमॅटोची लागवड झालेली आहे. दीडएक महिन्यात हे उत्पादन हाती येईल. रोज बाजारात चारशे ते साडेचारशे गाड्यांची उपलब्धता असते. त्यात या कालावधीत अधिक वाढ होते. उत्पादन अधिक आले की किंमतही खाली येते. घाऊकची स्वस्ताई किरकोळ बाजारामध्ये ग्राहकालाही दिलासा देते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुरवठा वाढणार
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आपल्याकडे मध्य प्रदेश, पंजाब येथून मटार येतो. सप्टेंबरमध्ये राज्यात होणाऱ्या विविध प्रकारच्या भाज्यांची आवक सुरू होते. त्यात हिरवा वाटाणाही असतो. मिरची, फरसबी, कारली, मेथी, कोथिंबीर, टोमॅटो यांचा पुरवठा चांगला व्हायला लागला की इतर भाज्यांचे दरही कमी होतात. पूर्वी बाजारात मोठ्या गाड्या यायच्या त्यासोबत आता राज्यातून तसेच परराज्यांतून भाज्यांची उपलब्धता वाढल्यानंतर छोट्या गाड्यांमधूनही माल येतो. त्याचा एकत्रित परिणाम पुरवठा वाढून किंमत कमी होण्यावर येतो. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या 'सीझनल' भाज्यांही मुबलक प्रमाणात येतील याकडे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकर पिंगळे यांनी लक्ष वेधले.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/oylzmCK
No comments:
Post a Comment