नाशिक: जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून, गुरुवारी सरासरी ५.१ मिमी पावसाची नोंद झाली. इगतपुरी, पेठ, सुरगाणा आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांतदेखील पाऊस गायब झाला आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी यलो अलर्ट दर्शविला असून, तुरळक पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात गुरुवारी (दि.६) सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत सरासरी पाच मिमी पावसाची नोंद झाली. सर्व तालुक्यांत कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. बागलाणमध्ये १७.८, तर मालेगाव तालुक्यात १०.३ मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला. देवळा आणि येवल्यात प्रत्येकी ९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित सर्व तालुक्यांत पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या आहेत.जळगाव जिल्ह्यात बुधवारी (दि. ५) रात्रीपासून दमदार पावसाला सुरुवात झाली. रावेर तालुक्यात मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडवली. रावेर तालुक्यातील नदीनाल्यांना पूर आला आहे. यात पाण्यात वाहून गेल्याने दोन जणांचा बडून मृत्यू झाला, तर एक जण बेपत्ता आहे. वीसपेक्षा जास्त गुरे वाहून गेली असून, सुमारे १४५ घरांचे नुकसान झाले आहे. रावेर तालुक्यात एकाच दिवशी ८५.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.रावेर तालुक्यात बुधवारी मध्यरात्री पावसाने झोडपून काढले. तालुक्यासह व मध्यप्रदेशात मुसळधार पाऊस झाल्याने सुकी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नागझिरी नदी, मात्रान नदी, रसलपूर येथील नदीला पूर आला. नदीच्या पुरात बाबुराव रायसिंग बारेला व शेख इकबाल कुरेशी वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. रावेर शहरातील माजी नगरसेवक सुधीर गोपाल पाटील दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यांचा रात्रीपासून शोध सुरू आहे. रसलपूरमध्ये बलेनो कार वाहून गेली असून, प्रवाशांनी गाडीतून उडी घेतल्याने सुदैवाने सर्व प्रवासी बचावले. रात्री पुराचे पाणी नदीकाठावरील अनेक घरांमध्ये घुसल्याने नागरिकांच्या संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. रमजीपूर, रसलपूर, खिरोदा गावांतील अनेक घर, दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच रमजीपूरमध्ये आलेल्या पुरात चार गुरे वाहून गेली. खिरोदा व रावेर येथील दहा ते बारा गुरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती नागरिकांनी दिली. तालुक्यात एकूण २० बकऱ्या, गाय-बैल व म्हैस अशी २० गुरे पाण्यात वाहून दगावली आहेत, तर १४५ घरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ZtLNiCH
No comments:
Post a Comment