सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू असून महाबळेश्वर- रस्त्यावर वाघेरा गावाजवळ कोसळून वाहतूक बंद झाली आहे. डोंगर खचून त्याचा मोठा भाग रस्त्यावर आला असून, ही घटना रात्री उशिरा घडली आहे. हा रस्ता महाबळेश्वरहून तळदेव, तापोळा या भागात जातो. तसेच तो पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तांबे दरे या गावाला जोडला गेला आहे. दरड काढण्याचे काम बांधकाम विभागाच्या कर्मचारी व ग्रामस्थांनी हाती घेतले असून रस्त्यावरील राडारोडा काढण्याचे काम सुरू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पुढील चार दिवस हवामान खात्याकडून जिल्ह्याला ऑरेज अलर्टचा इशारा दिला आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील पाटण, , जावली, वाई व सातारा तालुक्यांमधील प्रशासन सज्ज झाले असून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.आज दिवसभरात मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगड रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाने दखल घेत जेसीबीच्या साह्याने दरड हटवून रस्ता वाहतूक सुरळित केला. पाचगणीजवळील दांडेघर येथे विष्णु पांडुरंग कळंबे यांच्या घरावर अशोकाचे झाड पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे. तर पसरणी-पाचगणी घाटात दत्त मंदिराजवळ झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाले होती. त्यामुळे पाचगणी व वाई बाजूने वाहतूक वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तासाभरानंतर झाड काढण्याची केव्हाही झाल्यानंतर रस्ता वाहतुकीस सुरू झाला. महाबळेश्वर- सातारा रस्ता (काळा कडा) दरम्यान दगड व मातीचा राडारोडा रस्त्यावर येऊन रस्ता घसरडा झाला होता. तसेच दोन ठिकाणी ओसऱ्या पडल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. जेसीबीच्या सहाय्याने दगड व मातीचा राडा व ओसऱ्या काढून घेतल्या. या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. सातारा शहरालगत असलेल्या येवतेश्वर घाटात कोसळलेल्या दरडी तात्काळ हटवून वाहतूक सुरू करण्यात आली, तर घाटाईदेवी बायपास रस्त्यात दलदल झाल्याने रस्त्यावर खडी टाकून रस्ता पूर्ववत करण्यात आला. जिल्ह्यात आजअखेर २४७.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, हा पाऊस एकूण २० टक्के इतका आहे. सध्या जिल्ह्यातील कोयना धरणात ३२.२१ टक्के, धोम ३५.७६ टक्के, धोम-बलकवडी ७२.२२, कण्हेर २८.९९ टक्के, उरमोडी ४०.२१ टक्के, तारळी ६५.९२ टक्के इतका पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमधील एकूण ३५.३६ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या २४ तासात कोयनानगर २५३ मिलिमीटर, नवजा २७४ मिलिमीटर, तर महाबळेश्वर मध्ये ३३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/0gNhubG
No comments:
Post a Comment