Breaking

Wednesday, August 30, 2023

प्राचीन वस्तूच्या नावाखाली फसवलं, २५० कोटींच्या लालसेपोटी त्याने सव्वा कोटी गमावले https://ift.tt/190G3BF

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: गोरेगाव येथे वास्तव्यास असलेल्या पालिकेच्या एका कंत्राटदाराने प्राचीन वस्तूच्या विक्रीवरील कमिशनपोटी तब्बल एक कोटी ३० लाख रुपये गमावले आहेत. प्राचीन वस्तू विदेशात विक्री करण्यात आली असून तत्पूर्वी कर भरायचा असल्याचे सांगून कंत्राटदाराकडून पैसे उकळण्यात आले. इतकी मोठी रक्कम देऊनही पैसे मिळत नसल्याने या कंत्राटदाराने गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार केली.मुंबई पालिकेत मॅकेनिकल कंत्राटदार असलेल्या रोहिदास (बदललेले नाव) यांना त्यांच्या परिचयातील एका व्यक्तीचा फोन आला. त्याने माझ्या नातेवाईकाकडे एक प्राचीन वस्तू असून युनिव्हर्सल ग्रुपने या वस्तूची किंमत दोनशे कोटी रुपये लावली असल्याचे सांगितले. दोनशे कोटीसाठी ०.१ टक्का आंतरराष्ट्रीय कर म्हणजेच २० लाख रुपये भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याचे या व्यक्तीने सांगितले. इतकी रक्कम गुंतविल्यास वस्तू विक्री केल्यानंतर येणाऱ्या रकमेतील ५० टक्के रक्कम मिळेल, असेही सांगण्यात आले. चांगली रक्कम मिळणार असल्याने कंत्राटदाराने गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली. यानंतर वेगवेगळ्या नावाने त्यांना कमिशनची रक्कम भरण्यासाठीचे प्रक्रिया कशी असेल, हे सांगण्यासाठी फोन आले आणि मेलही आले. त्यामुळे कंत्राटदाराचा यावर विश्वास बसला. त्याने दिलेल्या खाते क्रमांकावर २० लाख रुपये ऑनलाइन पाठविले.कंत्राटदाराकडून सहज रक्कम मिळत असल्याचे पाहून विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या वस्तूंची किंमत २००हून ३०० कोटी आणि नंतर ५०० कोटींवर गेल्याचे सांगण्यात आले. किंमत वाढल्याने करही वाढणार असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे अधिक रकमेची मागणी करण्यात आली. आधीची रक्कम गुंतली गेल्याने कंत्राटदाराने टप्प्याटप्प्याने एक कोटी ३० लाख रुपये वेगवेगळ्या खाते क्रमांकांवर पाठविले. पैसे पाठवून बराच कालावधी गेला, तरी पैसे मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. याप्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/WK2xpgq

No comments:

Post a Comment