म. टा. वृत्तसेवा, कल्याण: रेल्वे सहायक लोको पायलट सुजीतकुमार जयंत (३०) याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना कल्याणमधील कोळसेवाडी परिसरात घडली आहे. तर, वरिष्ठांच्या जाचाला कंटाळूनच सुजीतने आत्महत्या केल्याचा आरोप करत सहकाऱ्यांनी संबधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मोटरमन कार्यालयात गोंधळ घातला.मागील तीन महिन्यांपासून सुजीतला कामावर हजर करून घेतले जात नव्हते. रितसर परीक्षा दिल्यानंतरही त्याला सेवेत न घेता त्याचा जाच सुरू होता. त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थितीही ढासळली होती. वरिष्ठांच्या जाचामुळेच त्याने आत्महत्या केल्याचे सांगत त्याच्या सहकारी लोको पायलटने मोटरमन कार्यालयात गोंधळ घालून संताप व्यक्त केला. तर, सुजीतला वेठीस धरणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. कल्याण रेल्वे लोको पायलट कार्यालयाबाहेर आरपीएफ व शहर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुजीत हा मूळचा उत्तर प्रदेश येथील राहणारा आहे. कल्याणच्या कोळसेवाडी परिसरात एकटा राहात असलेल्या सुजीत याने दोन ते तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबधित कर्मचाऱ्याने केलेले आरोप फेटाळले. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय करण्यात आलेला नसून त्याने वैयक्तिक कारणातून आत्महत्या केली असावी, असा दावा त्यांनी केला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/jNSQPmz
No comments:
Post a Comment