म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : आरे ते कफ परेड या मेट्रो ३ मार्गिकेवरील हुतात्मा चौक स्थानकासाठी अभिनव अभियांत्रिकी काम करण्यात आले. या स्थानकाच्या डोक्यावरील वारसा इमारतींच्या सुरक्षेसाठी जमिनीखाली १० हजार सूक्ष्म स्फोट करण्यात आले.मेट्रो ३ या राज्यातील पहिल्या भूमिगत मार्गिकेवर एकूण २७ स्थानके असून २६ स्थानके भुयारी आहेत. या २६ स्थानकांचे खोदकाम करताना प्रामुख्याने ऑस्ट्रियन पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. त्यामध्ये जमिनीवरून खाली खोदकाम यंत्रसामग्री नेण्यासाठी कमी जागा लागते. उभ्या पद्धतीने खोदकाम केले जाते. त्यानंतर जमिनीखाली भुयार खणत पुढे नेले जाते. याच पद्धतीने संपूर्ण ३३ किमी मार्गिकेचे भुयारीकरण १०० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र दक्षिण मुंबईतील हे काम वारसा इमारतींमुळे जोखमीचे होते. त्यातही हुतात्मा स्मारक स्थानकाचे काम अधिक जिकिरीचे होते. ही मार्गिका विकसित करणाऱ्या रेल्वे महामंडळ लिमिटेड (एमएमआरसी) कंपनीनुसार, भुयारीकरणावेळी काही ठिकाणी जमिनीखाली स्फोट घडविण्यात आले. मात्र हुतात्मा स्मारक स्थानकाच्या डोक्यावर दहाहून अधिक वारसा इमारती असल्याने स्फोटांमुळे या इमारतींना धक्का बसण्याची शक्यता होती. ते ध्यानात घेत मोठ्या स्फोटांऐवजी १० हजार सूक्ष्म स्फोट घडवून भुयार खणण्यात आले. यामुळे इमारतींना धक्का न बसता खोदकाम यशस्वीपणे पूर्ण झाले. या स्थानकासाठी २५३ मीटर लांबीचे फलाट वारसा इमारतींच्या खाली बांधण्यात आले आहेत. तसेच एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी एकमेकांना छेदणारे आठ लहान बोगदे तयार करण्यात आले आहेत. ही सर्व कामे जिकिरीची असूनही यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहेत. या स्थानकाचे काम ८२ टक्के पूर्ण झाले आहे.
पहिला टप्पा या वर्षअखेरीस सुरू
या मार्गिकेचा आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा डिसेंबर २०२३मध्ये सुरू होणार आहे. हुतात्मा स्मारक स्थानक हे मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्यात असून हा टप्पा डिसेंबर २०२४पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/zTPxW42
No comments:
Post a Comment