म. टा. वृत्तसेवा, कल्याण: सारे काही आलबेल असल्याचे भासवले जात असले तरी प्रत्यक्षात भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्याचे मनोमिलन मात्र झालेले नसल्याचे समोर आले आहे. कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका परिसरात भाजपचा एकतर्फी प्रचार करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रोखण्याचा प्रयत्न करत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोलसेवाडी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे गणित बांधत भाजपकडून 'अबकी बार ४०० पार'ची घोषणा करत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक घराघरावर पक्षाचे चिन्ह रेखाटण्याचे निर्देशदेखील देण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन करत भाजप कार्यकर्ते चक्की नाका परिसरातील भिंतीवर कमळ रेखाटत असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी त्यांना विरोध केला. शिवसेना-भाजप युती असताना शिवसेनेला बाजूला सारून केवळ भाजपचा प्रचार करणे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पचनी पडले नाही. यामुळेच सुरुवातीला त्यांनी अशाप्रकारचा एकतर्फी प्रचार करू देणार नसल्याची भूमिका घेत दमदाटी केली. यावर आम्ही केवळ पक्षादेश पाळत असल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यानी सांगितले. यामुळे शिंदे समर्थक कार्यकर्त्यानी भाजपच्या कार्यकर्त्याना बेदम चोप देत एकतर्फी प्रचार थांबविण्यास भाग पाडले.यामुळे भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी आणि माजी परिवहन सदस्य संजय मोरे यांनी कार्यकर्त्याच्या समवेत कोळसेवाडी पोलिस ठाणे गाठत शिंदे समर्थकांच्या विरोधात तक्रार दाखल केली. सकाळपासून तक्रार दाखल करण्याची मागणी करणाऱ्या शिंदे समर्थकावर गुन्हा दाखल करण्यात येत नसल्याने भाजप कार्यकर्त्यानी ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी दुपारनंतर शिंदेंच्या चार कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला.वरिष्ठांशी बोलल्यानंतर तक्रारया प्रकरणी सूर्यवंशी यांनी प्रतिक्रिया दिली. केंद्रात आणि राज्यात शिवसेना-भाजप युती असून आम्ही केवळ पक्षादेश पाळत प्रचार करत होतो. मात्र काही कार्यकर्त्यांनी परिणामांचा विचार न करता कायदा हातात घेतला. मारहाणीच्या या घटनेबाबत वरिष्ठांशी बोलून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावर वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील असे त्यांनी सांगितले. मात्र शिंदे समर्थक माजी नगरसेवकाचे नाव घेणे त्यांनी टाळले. या माजी नगरसेवकावर भाजपने दिवसभर टीका केली होती.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/BSshl3j
No comments:
Post a Comment