Breaking

Tuesday, August 1, 2023

Monsoon 2023 : राज्यात पावसाचं जोरदार कमबॅक होणार, कोकणाला ऑरेंज अ‍ॅलर्ट, मुसळधार पाऊस कुठं पडणार, जाणून घ्या https://ift.tt/hs3SUo1

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: जुलैच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये कोकण विभागात पडलेल्या मुसळधार पावसानंतर दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली. मात्र आता पुन्हा कोकण विभागात ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला असून बुधवारपासून तीन ते चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडू शकतो. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील पावसावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, अशी माहिती भारतीय हवामान विभागातर्फे मंगळवारी देण्यात आली.मंगळवारी बांगलादेशच्या किनाऱ्यावर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्यानंतर बुधवारी हे क्षेत्र पश्चिम बंगालमध्ये गंगाखोरे ओलांडण्याची शक्यता आहे. ही प्रणाली पश्चिम आणि वायव्य दिशेकडे सरकत आहे. परिणामी बुधवारपासून राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होत असून रायगड, रत्नागिरीला बुधवार, गुरुवारसाठी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीत या दोन दिवसांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्गात मात्र गुरुवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्येही बुधवार आणि गुरुवार हे दोन दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून गुरुवारी पालघर आणि ठाणे जिल्ह्यालाही ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यात शुक्रवारीही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल.पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसरालाही बुधवार आणि गुरुवारी ऑरेंज अॅलर्ट आहे. या दोन दिवशी पुणे आणि सातारा घाट परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर कोल्हापूर घाट परिसरामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल. पुणे आणि सातारा घाट परिसरामध्ये शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचे सातत्य कायम असण्याची शक्यता आहे.बुधवार आणि गुरुवारी उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता असून नंदूरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. मराठवाड्यात जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर येथे बुधवारी तर संभाजीनगर येथे गुरुवारी मेघगर्जनेसह पावसाची उपस्थिती असेल. विदर्भात सगळ्याच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ३ ऑगस्टनंतर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू कमकुवत होत असल्याने गेल्या दोन आठवड्यांप्रमाणे दीर्घकाळ मुसळधार पाऊस अनुभवावा लागणार नाही, असे सध्याचे चित्र दिसत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Vvzj8BA

No comments:

Post a Comment