Breaking

Saturday, August 26, 2023

Thane Crime: कसारा घाटात मृतदेह, हत्येचा अखेर उलगडा; पोलीस तपासांत धक्कादायक माहिती समोर https://ift.tt/xRCOj3y

ठाणे : ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दुहेरी हत्याकांडाचा छडा लावत चार आरोपींना अटक केली. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. हत्या झालेल्यांपैकी एकजण महिलेस सोशल मीडियावरून मेसेज आणि फोन करून त्रास देत होता. याच रागातून हे हत्याकांड घडल्याची माहिती समोर आली आहे. कसारा पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे.मुंबई-नाशिक महामार्गालगत कसारा घाटात दोन महिन्यांपूर्वी दोन व्यक्तींचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात १९ जून रोजी हत्येचा गुन्हा दाखल झाला. कोणत्यातरी कारणावरून दोघांची हत्या करून नंतर मृतदेह कसारा घाटात आणून टाकण्यात आले होते. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील साहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस उपनिरीक्षक महेश कदम आणि अन्य कर्मचारी, तसेच कसारा पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे तपासासाठी पथक स्थापन करण्यात आले. सुरुवातीला मृतांची ओळख पटवणे महत्त्वाचे होते. त्यादृष्टीने पोलिसांनी प्रयत्न सुरू केले. महिनाभरानंतर मृतांची ओळख पटली. सुफियान मिराबक्ष घोणे (३३), सहिल फिरोज पठाण (२१) अशी मृतांची नावे असल्याचे स्पष्ट झाले. दोघेही नगरचे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शिवाय लोणी पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याबाबत तक्रारही दाखल होती. परंतु, त्यांची नेमकी हत्या कोणी केली, याबाबत गूढ कायम होते. तपासासाठी पोलिसांचे पथक लोणी, शिर्डी येथेही गेले होते. तांत्रिक विश्लेषण आणि अन्य माहितीच्या आधारे गुन्हे शाखेला या दुहेरी हत्याकांडाचा छडा लावण्यामध्ये यश आले. शिर्डी येथील स्थानिक पोलिसांची मदत घेऊन शिर्डीत वास्तव्यास असलेला मनोज शिवाप्पा नाशी (२४) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने हा गुन्हा अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने केल्याचे सांगितले. अशा प्रकारे या प्रकरणात पोलिसांनी नाशी याच्यासह कुणाल प्रकाश मुदलीयार (२३), प्रशांत अंबादास खलुले (२५), फिरोज दिलदार पठाण (१९) या चौघांना अटक केल्याची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिली. सर्व आरोपी नगरचे असून या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रमेश तडवी करीत आहेत. अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. सुफियान हा सोशल मीडियाद्वारे महिलेस फोन आणि मेसेजद्वारे सतत त्रास देत होता. याच रागातून हा गुन्हा घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Asm7HTi

No comments:

Post a Comment