म. टा. प्रतिनिधी, पुणे : संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) तक्रारीवरून राज्याच्या दहशतवादी विभागाने डॉ. प्रदीप कुरुलकरला चौकशीसाठी बोलावले. ‘डीआरडीओ’ची तक्रार आणि एसटीएसची चौकशी यात कुरुलकरला २४ तासांचा अवधी मिळाला. त्यामध्ये त्याने वैयक्तिक मोबाइलमधील सर्व ‘डेटा’ डिलिट केला असून, त्या ‘डेटा’ची अद्यापही ‘एटीएस’ला प्रतीक्षा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.डिलिट केलेला ‘डेटा’ परत मिळविण्यासाठी कुरुलकरचा वैयक्तिक मोबाइल गुजरातमधील गांधीनगर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविला असून, साधारण एक ते दीड महिन्यात त्याचा अहवाल अपेक्षित आहे.‘आर अँड डी ई’चा संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याची ‘डीआरडीओ’ने २४ फेब्रुवारीपासून चौकशी सुरू केली होती. त्या वेळी ‘डीआरडीओ’ने कुरुलकरचा कार्यालयीन वापराचा मोबाइल, लॅपटॉप आणि हार्ड डिस्क आदी वस्तू ताब्यात घेतल्या होत्या. ‘डीआरडीओ’च्या प्राथमिक चौकशी कुरुलकर दोषी असल्याचे आढळून आले. त्यानंतर संस्थेने ‘एटीएस’कडे तक्रार अर्ज दिला होता. त्या अर्जावरून ‘एटीएस’ने कुरुलकरला चौकशीसाठी ‘एटीएस’च्या कार्यालयात बोलावले होते. या सर्व घडामोडींमध्ये कुरुलकरला २४ तासांचा वेळ मिळाला होता. ‘डीआरडीओ’ने कुरुलकरकचे कार्यालयीन ‘गॅजेट्स’ जप्त केले होते. मात्र, त्याचा वैयक्तिक मोबाइल त्याच्याकडेच होता. ‘एटीएस’ चौकशीपूर्वी त्याला मिळालेल्या वेळेत त्याने ‘डेटा’ डिलिट केला असण्याची शक्यता ‘एटीएस’ने वर्तवली आहे. त्या मोबाइलमधून कुरुलकरने नेमका काय संवाद साधला आहे किंवा कोणती माहिती पाठवली आहे, याची माहिती गुन्हा सिद्ध करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरू शकते, असे ‘एटीएस’च्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/YTwVn2Q
No comments:
Post a Comment