नवी दिल्ली: भारतानं आशिया कपमधील दुसरा सामना सहज जिंकला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाऊस पडल्यानं दोन्ही संघांना एक-एक गुण मिळाला. त्यामुळे नेपाळविरुद्धच्या सामन्यात भारताला विजय गरजेचा होता. या सामन्यातही पावसाचा व्यत्यय आला. पण डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे भारतानं सामना सहज जिंकला. भारताच्या विजयाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक वादात सापडला आहे. गौतम गंभीर सामन्याआधी मैदानातून समालोचन कक्षाकडे निघाला होता. त्यावेळी तिथे विराट कोहलीचे चाहते उपस्थित होते. गौतम गंभीर समालोचन कक्षाकडे जात असताना चाहत्यांनी कोहलीच्या नावे घोषणा दिल्या. त्या घोषणा ऐकून गंभीर संतापला. त्यानं कोहलीच्या नावानं घोषणा देणाऱ्या चाहत्यांना हाताचं मधलं बोट दाखवलं. गंभीरच्या या कृतीवर टीका होत आहे. गौतम गंभीर मधलं बोट दाखवत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याबद्दल माध्यमांच्या प्रतिनिधींनी गंभीरला विचारणा केली. त्यावर त्यानं स्पष्टीकरण दिलं. दोन-तीन पाकिस्तानी प्रेक्षक हिंदुस्तान मुर्दाबाद म्हणत होते. भारताच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. त्यांना उत्तर देणं गरजेचं असल्यानं मी ती कृती केली, अशा शब्दांत गंभीरनं त्याच्या कृतीचं समर्थन केलं. सोशल मीडियावर जे दाखवण्यात येत आहे, ते खरं नाही. कारण लोक तेच दाखवतात, जे सर्वांना पाहायचं असतं, असं गंभीर म्हणाला. तुम्ही व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य समजून घ्यायला हवं. जर तुम्ही भारताविरोधात घोषणा दिल्या आणि काश्मीरबद्दल बोललात, तर समोरील व्यक्ती नक्कीच प्रतिक्रिया देणार. तो तिथून हसून तर निघून जाणार नाही ना, असा प्रश्न गंभीरनं विचारला. तिथे २-३ पाकिस्तानी होते. ते भारताविरोधात, काश्मीरबद्दल बोलत होते. त्यामुळे त्यावर मी जे केलं, ती माझी स्वाभाविक प्रतिक्रिया होती. मी माझ्या देशाविरोधात काहीही ऐकून घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या घोषणा ऐकून मी माझी प्रतिक्रिया दिली. कोणी मला किंवा माझ्या देशाला शिव्या दिल्या, तर मी त्याला नक्कीच प्रत्युत्तर देईन. सगळं ऐकून घेईन, सहन करेन असा माझा स्वभाव नाही, असं गंभीर म्हणाला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/4ctJ9AY
No comments:
Post a Comment