म. टा. प्रतिनिधी, नाशिक / नाशिकरोड : गणेश विसर्जनाची धामधूम सुरू असताना शहरात गोदावरी आणि वालदेवी नदी पात्रात आठ जण बुडाल्याने उत्सवाला गालबोट लागले. नाशिकरोड भागातील वालदेवी नदीपात्रात तीन तरुणांचा विसर्जनावेळी पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर पंचवटीतल्या गोदावरी नदीपात्रात बुडालेल्या पाचपैकी चौघांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या हाती लागले आहेत. एकाचा शोध अद्याप सुरू आहे.गंगापूर धरणातून विसर्ग होत असल्याने गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गणेश विसर्जनावेळी नदी पात्रात उतरल्याने पाच जण बुडाले. त्यापैकी बुधराम ओमप्रकाश मौर्या (२४, रा. कुमावतनगर, मखमलाबादरोड), राहुल सत्यनारायण मौर्या (१४, रा. विडी कामगारनगर, अमृतधाम) आणि सोहन भगवतीप्रसाद सोनकर (२८, रा. शरदचंद्र पवार मार्केट यार्डाजवळ, पेठरोड), प्रदीपकुमार वर्मा (२१, रा. सुदर्शन कॉलनी, पेठरोड, पंचवटी) यांचे मृतदेह हाती लागले आहेत. गुरुवारी (दि. २८) सायंकाळी हे सर्वजण नदीपात्रात बुडल्यानंतर शुक्रवारी (दि. २९) सकाळी त्यांचे मृतदेह सापडले. तर, सोनू हरिश्चंद्र चव्हाण (२५, रा. वडाळा, नाशिक) याचा शोध सुरू आहे.दरम्यान, बुधराम, राहुल, सोहन, प्रदीपकुमार हे विसर्जनावेळी अंघोळीसाठी मोदकेश्वर मंदिरासमोरील नदीपात्रात उतरले. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते बुडाले. हे सर्वजण परप्रांतीय असून, कामानिमित्त काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये वास्तव्यास आल्याची माहिती पंचवटी पोलिसांनी दिली. हे शोधकार्य मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी, लीडिंग फायरमन संजय कानडे, प्रदीप परदेशी यांच्यासह एम. के. सोनवणे, राजू नाकील, यू. आर. झिटे, पी. एम. भास्कर, एस. जी. मतवाळ, व्ही. जी. नागपुरे व स्थानिक जीवरक्षकांच्या पथकाने केले.नाशिकरोडला दोघांचा मृत्यूपरवानगी नसलेल्या आणि धोकादायक ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी जाणे नागरिकांच्या जीवावर बेतले आहे. नाशिकरोड परिसरातील वालदेवी नदीपात्रात बुडून दोघांचा मृत्यू झाला. गुरुवारी (दि. २८) सायंकाळी साडेचार वाजता सामनगाव रस्त्यावरील एका सोसायटीच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी भाविक जमले. मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचा अंदाज भक्तांना नव्हता. गणेश विसर्जन करतेवेळी रोहित वैजनाथ नागरगोजे (१९, रा. गजानन इस्टेट, बनकर मळा) आणि प्रसाद सुनील दराडे (१८, रा. एम्पायर मार्बलजवळ, सिन्नर फाटा) हे दोघे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यांना वाचविण्यासाठी आकाश गिते, विकी करनकाळ, ओमकार कांबळे आणि साहिल राख या तरुणांनी पुलाच्या दिशेने धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन आणि पोलिसांनी त्वरित मदतकार्य राबविण्यास सुरुवात केल्यावर बेलतगव्हाण पुलाजवळ रोहितचा मृतदेह आढळला. तर, प्रसाद दराडेचा मृतदेह चेहेडी गावाजवळ आढळला. या दोघांच्या मृत्यूप्रकरणी नाशिकरोड पोलिसांत अकस्मात मृत्यू नोंदविण्यात आला आहे.वडनेर दुमालातील मृतदेह आढळलावडनेर दुमाला येथे गुरुवारी (दि. २८) सायंकाळी साडेपाच वाजता विसर्जनावेळी हेमंत कैलास सातपुते (३३, रा. वडनेर दुमाला) हे नदी पात्रात बुडाले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेण्यात आला. शुक्रवारी (दि. २९) सकाळी शोधकार्य सुरू झाल्यावर वालदेवी नदीपात्रात सातपुते यांचा मृतदेह आढळला. उपनगर पोलिसांत याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/unyIUZv
No comments:
Post a Comment