म. टा. प्रतिनिधी, जळगाव: ज्येष्ठ गांधीवादी नेते व स्वातंत्र्य सेनानी साने गुरूजी यांची कर्मभूमी म्हणून जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहर अवघ्या महाराष्ट्रात परिचित आहे. मात्र, याच शहरात गुरुवारी (दि. २८) मध्यरात्री गणेश विसर्जन मिरवणुकीत महात्मा गांधी यांच्या हत्येतील दोषी नथुराम गोडसे याच्यासह संभाजी भिडे यांच्या प्रतिमा नाचवित जयघोष करण्यात आला. भिडे यांच्यावर भारतीय राष्ट्रध्वज नाकारल्याप्रकरणी विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.अमळनेर शहरात गुरुवारी सायंकाळी सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास शहराच्या पान खिडकी परिसरातील जय बजरंग गणेश मंडळाची मिरवणूक निघाली. शहराच्या मध्यवर्ती भागातून निघालेली ही मिरवणूक बोरी नदीलगतच्या दगडी दरवाजालगत पोचली. येथे मिरवणुकीत काही कार्यकर्ते आले. ते महात्मा गांधी यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या नथुराम गोडसे याची प्रतिमा घेऊन आले. एका बाजुला गोडसे तर दुसऱ्या बाजुला संभाजी भिडे याची प्रतिमा होती. यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बागेश्वर धामचे पंडित धिरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या देखील प्रतिमा नाचविण्यात आल्या. पोलिसांची बघ्याची भूमिका‘डीजे’च्या तालावर कार्यकर्ते नथुराम आणि भिडे यांच्या प्रतिमा नाचवित होते. यावेळी मात्र, पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. येत्या काही दिवसांत अमळनेर शहरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. तत्पूर्वी, नथुराम, भिडे यांचे जाहीर उदात्तीकरण केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Vrd51gy
No comments:
Post a Comment