कल्याण : गणेशोत्सव काळात विविध वस्तूंपासून गणपती बनवत कलाकार आपल्यातील कलेची चुणूक दाखवतात. यंदा डोंबिवलीतील बालभवनमध्ये भरविण्यात आलेल्या अगरबत्ती महोत्सवात कलाकारांनी चक्क पावणे दोन लाख पर्यावरण पूरक अगरबत्त्यांपासून आकर्षक गणपती तयार केला असून या बाप्पाच्या मूर्तीवर करण्यात आलेल्या रोषणाईमुळे बाप्पाची मूर्ती प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रत्येकाला खुणावत आहे. विविध रसायनांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या अगरबत्तीला पर्याय म्हणून डोंबिवलीतील अगरबत्ती विक्रेत्याने डोंबिवलीतील बालभवनमध्ये भारतीय बनावटीच्या पूर्णपणे रसायनविरहित अगरबत्त्यांचे प्रदर्शन भरवले आहे. मागील दहा दिवसांत या प्रदर्शनाला कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरातील हजारो नागरिकांनी भेट देत या अगरबत्त्यांची खरेदी केली आहे. विविध सुगंध ल्यायलेल्या, मात्र तरीही कोणत्याही प्रकारचे रसायन नसलेल्या या अगरबत्त्यांचे नागरिकांनी कौतुक केले आहे. याच प्रदर्शनात मांडण्यात आलेला बाप्पादेखील तितकाच आकर्षक ठरला आहे. दरवर्षीच या प्रदर्शनात अगरबत्तीपासून एखादी आकर्षक कलाकृती ग्राहकांसाठी सादर केली जाते. विविध रंगांतील आणि आकारांच्या अगरबत्त्यांपासूनच या कलाकृती तयार केल्या जातात. यंदा या प्रदर्शनात तयार करण्यात आलेला बाप्पा साकारण्यासाठी पावणेदोन लाख आगरबत्त्यांचा वापर करण्यात आला. या अगरबत्त्यांची पावडर करून त्यातून काड्या बाजूला काढत त्या पावडरीपासून बाप्पाची प्रतिमा तयार करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक उत्सवाचा संदेश समाजाला देण्यासाठीच अशाप्रकारे रसायनविरहित उत्सवाचा पुरस्कार केला जात असल्याचे यावेळी आयोजकांनी सांगितले. हजारो ग्राहकांनी या उत्सवात रसायनविरहित अगरबत्ती खरेदीवर भर दिला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/5rTuGUZ
No comments:
Post a Comment