Breaking

Sunday, September 17, 2023

ऑनलाइन गेम खेळण्यासाठी पैसे हवेत म्हणून चोरी; टिकटॉक स्टारला साकीनाका पोलिसांकडून अटक https://ift.tt/Van4pSK

मुंबई: ऑनलाइन गेम खेळण्यासाठी पैसे हवेत म्हणून चोऱ्या करणाऱ्या टिकटॉक स्टारला साकीनाका पोलिसांनी अटक केली. अभिमन्यू गुप्ता असे त्याचे नाव असून चोरीनंतर चक्क विमानाने तो रांची येथे गेला होता. अभिमन्यू याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. साकीनाका येथे राहणाऱ्या संपत (बदललेले नाव) यांच्या घरातून पैसे चोरीला गेले होते. कामानिमित्त बाहेर गेलेले संपत सकाळी परतले त्यावेळी घराच्या दरवाजाचे कुलूप आणि कडी तुटलेली आढळली. याची माहिती त्याने साकीनाका पोलिसांना दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी घरफोडी आणि चोरीचा गुन्हा दाखल केला. उपायुक्त दत्ता नलावडे, वरिष्ठ निरीक्षक गबाजी चिमटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र नागरे, कदम, शेख, करांडे, सौंदरमल, शिगवण, पिसाळ आदी पथकाने तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एका फुटेजमध्ये अभिमन्यूचा चेहरा दिसला. वेगवेगळ्या माध्यमातून माहिती काढत असताना तो रांची येथे असल्याचे समजले. पोलिसांच्या पथकाने रांची येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. अभिमन्यू हा सिव्हिल इंजिनीअर म्हणून एका ठिकाणी कामाला होता. नोकरी सुटल्यावर तो व्हिडीओ बनवून टिकटॉकवर अपलोड करू लागला. टिकटॉक बंद झाल्यावर त्याला ऑनलाइन गेम खेळण्याचा छंद जडला. गेम खेळण्यासाठी त्याने चोऱ्या करण्यास सुरुवात लागला. त्याच्या विरोधात १२ गुन्हे दाखल आहेत. चोरीच्या गुन्ह्यात अभिमन्यू हा काही दिवस तुरुंगात होता. येथून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा चोऱ्या करण्यास सुरुवात केली. टिकटॉकवरील व्हिडिओमुळे तो खूप प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे त्याचे समाजमाध्यमांवर लाखो फॉलोअर्स आहेत. मुंबईतील अन्य गुन्ह्यांमध्ये त्याच्या सहभागाची शक्यता आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/lDfcIVq

No comments:

Post a Comment