नागपूर: गणेश विसर्जन झाल्यानंतर कृत्रिम टँकमध्ये जमा झालेला गाळ दूर करुन वापरायोग्य माती तसेच सजावटीच्या अन्य वस्तू गोळा केल्या जातील. या सर्व वस्तू पारंपारिक मूर्तीकारांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे विसर्जनातूनच नव्या मूर्ती घडतील, असा प्रयत्न मनपातर्फे केला जाणार असल्याची माहिती नागपूर महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शपथपत्र दाखल करीत दिली आहे. पीओपी गणेश मूर्तीं व त्यांमुळे होणारे प्रदूषण याबाबत न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करवून घेतली आहे. त्यावर बुधवारी न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर आणि वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यावेळी मनपातर्फे ॲड. जे. बी. कासट यांनी शपथपत्र दाखल केले. त्यानुसार, विसर्जनानंतर कृत्रीम तलावातील दुषीत पाणी सक्शनमशीनद्वारे प्रथम काढण्यात येईल. या पाण्यावर महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात प्रक्रिया केली जाईल. त्यानंतर, टँक मधील निरुपयोगी वस्तूंची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. तर, तळाला उरलेली माती पारंपारिक मूर्तीकारांना दिली जाईल. इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यावर महापालिकेचा भर असून त्या दृष्टीने अशा उपक्रमाद्वारे पावले उचलण्यात येत असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. तसेच निर्माल्याच्या व्यवस्थापनासाठी शहरात १३ निर्माल्य रथांचे नियोजन करण्यात आले आहे. तलाव आणि नैसर्गिक जलस्रोतांच्या आसपास कुंपण घालण्यात आले आहे. यामुळे तेथे विसर्जन करता येणार नाही. गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी शहरात ४१३ कृत्रीम तलावांची सुविधा करण्यात आली आहे. तसेच चार फुटांहून अधिक उंची असलेल्या गणेशमूर्तींचे विसर्जन शहर हद्दीच्या बाहेर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विसर्जनानंतर प्रदूषित पाण्यावर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात प्रक्रिया केली जाईल. यावर न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर निश्चित केली आहे. न्यायालय मित्र म्हणून ॲड. श्रीरंग भांडारकर यांनी काम पाहिले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/SFfx0oV
No comments:
Post a Comment