म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर गुरुवारी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर जवळपास अडीच तास सुनावणी झाली. शिवसेनेने प्रत्येक आमदाराची सुनावणी एकत्रितपणे घ्यावी, अशी मागणी केली. तर, ठाकरे गटाने त्यास जोरदार विरोध केला. आता आमदार अपात्रतेसंदर्भात स्वतंत्र सुनावणी होईल की एकत्रित याबाबतचा निकाल येत्या २० ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे.सुनावणीदरम्यान याचिका एकत्र करण्याच्या मुद्द्यावर ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. ठाकरे गटातील प्रत्येक वकिलाकडून मुद्देसूद मांडणी करण्यात आली. तर शिंदे गटाकडून युक्तिवाद खोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘सुनावणी वेळेत होईल यासाठी आमचे संपूर्ण सहकार्य आहे. आमदारांच्या वेगवेगळ्या याचिका असून, त्यांची कारणेदेखील निराळी आहेत. त्यामुळे स्वतंत्रपणे सुनावणी घ्यावी, असा मुद्दा मांडला’, असे शिंदे गटाचे वकील अॅड. अनिल साखरे यांनी नमूद केले. ‘आज तीन अर्जांवर सुनावणी झाली. आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर एकत्र सुनावणी व्हावी, काही अधिकची कागदपत्रे द्यायची आहेत, कागदोपत्री पुरावा रेकॉर्डवर घ्यावा, ठाकरे गटाला आणखी अतिरिक्त मुद्दे उपस्थित करायचे आहेत. या तीन अर्जांवर आज सुनावणी झाली’, असे अॅड. साखरे यांनी सांगितले.उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी यावेळी शिंदे गटावर टीका केली. ‘कायद्याचा किस पाडून वेळ काढला जात आहे. प्रत्येक आमदाराची सुनावणी स्वतंत्र घेणे योग्य नाही. त्यांच्यावर अपात्रतेची तलवार टांगती आहे. त्यामुळे वेळकाढूपणा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात न्याय मागावा, की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे’, असेही देसाई म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे आमदार प्रतोद सुनील प्रभू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे आमचे वकील देवदत्त कामत यांनी एकत्र सुनावणी घ्या, अशी मागणी केली. मात्र शिंदे गटाने वेगवेगळी सुनावणी घ्यावी, असा आग्रह धरला. अध्यक्षांनी मात्र लोकशाहीला धरून निर्णय द्यायला हवा’, अशी अपेक्षा प्रभू यांनी व्यक्त केली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/BZUdf2L
No comments:
Post a Comment