दिवा: दिव्यातील साबे गावात डी. जे. कॉम्प्लेक्समधील एका इमारतीच्या चौथा मजल्यावरील घरात बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सिलेंडर स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की या दुर्घटनेत दोघं होरपळले. शांतीलाल मोहन सोलंकी (वय ४५) आणि प्रेरणा श्रीराम लांबे (वय ४०) असे महिला आणि पुरुषाचे नाव आहे जे १०० टक्के भाजले आहेत. या जखमींना पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन टीमने त्वरित धाव घेत आग आटोक्यात आणली. बुधवारी साडे नऊ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार साबेगाव, दिवा (पूर्व) ठाणे या ठिकाणी सीताबाई निवास या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर रूम नं. ४०२ मध्ये सिलिंडर लिकेज झाल्याने भडका उडून आग लागली होती. सदर घटनास्थळी पोलीस कर्मचारी, टोरंट कंपनीचे कर्मचारी, तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी १- पिकअप वाहनासह तसेच अग्निशमन दलाचे जवान १- फायर वाहन, १- रेस्क्यु वाहनासह व खाजगी १- रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहचले. सदर घटनास्थळी रूम मध्ये लागलेली आग सव्वादहा वाजताच्या सुमारास पुर्णपणे विझविण्यात आली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/1iRVbXH
No comments:
Post a Comment