पुणे: गुन्हेगार मित्राला जामीन मिळवून देण्यासाठी एकाने ठाण्यातील चोरट्याची मदत घेऊन शहरात साखळीचोरीचे गुन्हे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चोरट्याला अटक करण्यात आली असून ठाण्यातील चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्याकडून साखळीचोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. बिबवेवाडी भागात दांडिया खेळण्यासाठी आलेला चोरटा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. मिळालेल्या माहितीनुसार, सागर संदीप शर्मा (वय २०, रा. एसआरए वसाहत, लेकटाउन, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी त्याचा साथीदार प्रथमेश ऊर्फ पिल्या प्रकाश ठमके (वय २५, रा. पारसेवाडी, कोपरी, ठाणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिबवेवाडी भागात सकाळी फिरायला जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीस्वारांनी हिसकावले होते. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांनी बिबवेवाडीतील लेकटाउन सोसायटी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा आरोपी ‘एसआरए’ वसाहतीकडे दुचाकीवरून गेल्याचे आढळले. शर्माने साथीदाराच्या मदतीने साखळीचोरीचे गुन्हे केल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी मितेश चोरमले, अभिनय चौधरी, अवधूत जमदाडे यांना मिळाली. शर्मा बिबवेवाडी भागात दांडिया खेळण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. गुन्हेगार मित्राला जामीन मिळवून देण्यासाठी महिलांचे दागिने हिसकावण्याचे गुन्हे केल्याची कबुली त्याने दिली. ठाण्यातील चोरटा ठमके याची मदत घेऊन शर्माने विश्रांतवाडी, भारती विद्यापीठ, कोंढवा, येरवडा भागात दागिने हिसकावण्याचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडून एक लाख १५ हजार रुपयांच्या दोन सोनसाखळ्या जप्त करण्यात आल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय पुराणिक, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, गिरीश दिघावकर, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, शैलेंद्र साठे, चेतन गोरे, महेश बारावकर, मंगेश पवार, नीलेश खैरमोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/p7oVHqr
No comments:
Post a Comment