पणजी : गेल्या नऊ वर्षांत केंद्र सरकारने क्रीडाविषयक खर्चात तिप्पट वाढ केली आहे. याचप्रमाणे २०३६ च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे यजमान भूषवण्यासाठी देश उत्सुक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी गोव्यात ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात केले.मोदी यांनी याबाबत सांगितले की, "आधीच्या सरकारची खेळाप्रती फारशी रूची दाखवली नाही. त्यांच्यासाठी क्रीडा हा केवळ एक खेळ होता. त्यावर खर्च करण्याची गरज नाही. मात्र, ही मानसिकता आम्ही बदलली. आम्ही खेळावरील बजेट वाढविले. यंदाच्या क्रीडा क्षेत्रासाठीच्या बजेटमध्ये आम्ही मागील नऊ वर्षांपेक्षा तिपटीने वाढ केली." मोदी यांनी पुढे सांगितले की, "क्रीडा क्षेत्रासाठीच्या पायाभूत सुविधांमध्ये आम्ही आमूलाग्र बदल केलेत. आम्ही खेळाडूंच्या आर्थिक मदतीत वाढ केली. खेळाप्रती बघण्याकडे लोकांचा दृष्टिकोन आम्ही बदलला. जुनी विचारसरणी आम्ही बाजूला केली. खेलो इंडियापासून ते टॉप्स या योजनेद्वारे आम्ही गुणवत्ता हेरून खेळाडूंच्या सराव आणि डाएटवर अधिक खर्च केला. याचा परिणाम म्हणजे एशियाड आणि पॅरा एशियाडमध्ये भारताला सर्वाधिक पदके मिळाली. क्रीडाक्षेत्रातील विकास आणि भारताच्या विकासाशीच निगडीत आहे. याच जोरावर आम्ही २०३६च्या ऑलिम्पिक यजमानपदाचे स्वप्न बघत आहोत." ‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून देशभरातली क्रीडापटू एकत्रित येतात. या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेचे आणि खिलाडूवृत्तीचे दर्शन घडते,’ असे मोदी यांनी सांगितले. या कार्यक्रमाला केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या या उद्घाटन सोहळ्यात गोव्याचे सांस्कृतिक प्रतिबिंब उमटवणारे कार्यक्रम सादर करण्यात आले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती टेनिसपटू ऋतुजा भोसले आणि कबड्डीपटू आकाश शिंदे यांनी सोहळ्यात महाराष्ट्राच्या ध्वजवाहकाची भूमिका पार पाडली. या वेळी बोलताना मोदी म्हणाले, ‘देशात गुणवान खेळाडूंची कमतरता नाही. आतापर्यंत देशाने अनेक चॅम्पियन खेळाडू घडविले आहेत.’ याचबरोबर मागील ३० ते ३५ दिवसांत केंद्र सरकारने केलेल्या कामाचा पाढा त्यांनी या वेळी वाचून दाखविला. गोव्यातील राष्ट्रीय स्पर्धा नऊ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. यात देशभरातील दहा हजारांहून अधिक अॅथलिट सहभागी झाले असून, एकूण ४३ क्रीडा प्रकारांचा यात समावेश आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/17AtH0u
No comments:
Post a Comment