जयपूर: एकाच कुटुंबातील तीन जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेत पती, पत्नी आणि मुलाने पपईच्या रसात विष मिसळून आपले जीवन संपवले आहे. राजस्थानमधील जयपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सामूहिक आत्महत्येमागचे जे कारण समोर आले आहे ते आणखीनच धक्कादायक आहे. प्राथमिक तपासात मृत व्यक्तीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असून तो या आजाराने त्रस्त असल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर घराच्या कर्जामुळे कुटुंब आर्थिक संकटात सापडले होते, असंही सांगितलं जात आहे. अशा परिस्थितीत नैराश्येपोटी त्यांनी हे भयानक पाऊल उचलले.जयपूरच्या बालाजी विहारमध्ये ही घटना घडली असून, मृत नवीन जैन हे गेल्या १० वर्षांपासून पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत होते. नवीन जैन, मूळचे नवलगढच्या बसवा गावचे रहिवासी आहेत, त्यांचे एक मेडिकलचे दुकान होते जे त्यांचा मोठा मुलगा अनुराग सांभाळतो. मात्र, गेल्या रविवारी रात्री अनुराग नेहमीप्रमाणे मेडिकलचे दुकान बंद करून घरी परतला असता त्यांना घराचा दरवाजा आतून बंद दिसला.बराच वेळ प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेजाऱ्यांना बोलावून दरवाजा तोडला. अनुरागने आत प्रवेश करताच त्याचे आई-वडील आणि भाऊ बेशुद्ध पडलेले दिसले. त्यांनी तत्काळ तिघांनाही रुग्णालयात नेले, तेथे पती-पत्नीला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर सोमवारी सायंकाळी उपचारादरम्यान मयंकचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच कर्धनी पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून विषारी गोळ्या आणि इतर साहित्य जप्त केले आहे. पोलिस अधिकारी उदय सिंह यांनी सांगितले की, ४१ वर्षीय नवीन जैन, ३९ वर्षीय त्यांची पत्नी सीमा आणि लहान मुलगा मयंक यांनी रविवारी विषमिश्रित रस प्यायल्याने तिघांचाही मृत्यू झाला. तिन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन केल्यानंतर ते कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. नवीन स्वतःच्या आजारपणामुळे आणि आर्थिक विवंचनेमुळे त्रस्त असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळेच त्याने असे पाऊल उचलले असले तरी सर्वांनी मिळून विष प्यायले की नवीनने आधी पत्नी आणि मुलाला विष पाजले आणि नंतर ते स्वतः प्यायले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Li7Mesu
No comments:
Post a Comment