ठाणे: मुंबईच्या वेशीवरील टोल दरवाढीविरोधात प्रतिकात्मक आंदोलन करण्यासाठी मुलुंड टोल नाक्यावर आलेल्या मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह मनसे पदाधिकार्यांना सोमवारी दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या सर्व पदाधिकाऱ्यांना रात्री उशिरा मुलुंडच्या नवघर पोलिसांनी अटक केली. याआधी अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुलुंड टोलनाका येथील टोलचौकी सोमवारी सायंकाळी पेटवली. या जाळपोळीत चौकीतील साहित्याचे नुकसान झाले होते. या प्रकरणातही जाळपोळ करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकाळी टोलदरवाढी विरोधात मुंबईत पत्रकार परिषद घेतल्यानंतर शहरातील विविध टोलनाक्यावर याप्रश्नी पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. टोल हा एक मोठा घोटाळा, भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला. टोल दरवाढ मागे न घेतल्यास टोलनाके जाळून टाकू, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर मुलुंड टोल नाका येथे प्रतीकात्मक आंदोलन करणाऱ्या मनसे नेते व ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह मनसेचे रवींद्र मोरे, पुष्करराज विचारे, संदीप साळुंखे, सत्यवान दळवी यांना ताब्यात घेतले होते. सर्व पदाधिकाऱ्यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली. तसेच मुलुंड टोलनाक्याची जाळपोळ करणाऱ्या ठाणे आनंदनगर येथील मनसे शाखाध्यक्ष रोशन वाडकर यांच्यासह कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात घेण्यात आले. मनसे पदाधिकाऱ्यांची सुटका करण्यासाठी मनसे जनहित व विधि विभागाचे अँड. ओंकार राजुरकर व अँड. राजेंद्र शिरोडकर पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. टोल दरवाढीविरोधात ऐरोली टोलनाक्यावर आंदोलन करणाऱ्या नवी मुंबई ऐरोली विधानसभा अध्यक्ष कल्पेश बेमोसे, भूषण आगीविले, विश्वनाथ दळवी दीपक सिंग, दत्ता कदम, संतोष जाधव या मनसे पदाधिकाऱ्यांनाही पोलिसांनी अटक केली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ucYWsBg
No comments:
Post a Comment