जळगाव: जिल्ह्यातील कजगाव (ता. भडगाव) येथील गोंडगाव रोडवरील रहिवासी ओंकार रामदास चव्हाण आणि रहिवासी राजश्री नितीन देशमुख यांच्या घरावर धारदार तलवारीचा धाक दाखवत मारहाण करत दरोडेखोरांनी सोने चांदीसह रोकड असा ५ लाख ५१ हजार रुपयांचा ऐवज लटून नेला आहे. ही दरोड्याची थरारक घटना आज सोमवारी पहाटे एक ते अडीच दरम्यान घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कजगाव येथील स्टेशन भागातील रहिवासी असलेल्या राजश्री नितीन देशमुख (४८) या घरात एकट्याच असताना मध्यरात्री त्यांच्या घराच्या दरवाजाची कडी तोडत दरोडेखोरांनी आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेले आणि अंगावरील सोने असे ऐवज लांबिवले. तसेच तलवार, लोखंडी रॉडचा धाक दाखवून महिलेस मारहाण केली. या घरात साडेसात तोळे सोने आणि एक लाख रुपये रोख दरोडेखोरांनी लूटून नेली. त्यानंतर तेथून काही अंतरावर असलेल्या बापु खोमणे यांच्या घराची कडी तोडण्यासाठी प्रयत्न सुरू केला. मात्र बापु खोमणे यांना दरोडेखोर आले असल्याचा फोन आल्याने ते जागे झाले. तेव्हा दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. त्यानंतर काही अंतरावर असलेल्या कजगाव गोंडगाव मार्गावरील रहिवासी ओंकार रामदास चव्हाण यांच्या घराकडे मोर्चा वळविला.तेथे बाहेर झोपलेले ओंकार चव्हाण यांना या दरोडेखोरांनी जबर मारहाण करत घरात प्रवेश केला. एका खोलीमध्ये त्यांची पत्नी ताराबाई ओंकार चव्हाण या झोपलेल्या होत्या. दरोडेखोरांनी त्याच्यावर हल्ला करत तलवार रोखत अंगावरील एक किलो वजनाचे चांदीचे कडे तसेच अंगावरील सोन्याची पोत, कानातले असं अडीच तोळे सोने लांबविले. तसेच आरती समाधान चव्हाण यांचे अंगावरील अडीच तोळे सोन्यासह ८५ हजार रुपये रोख असा चार ते पाच लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी लांबवला. ताराबाई चव्हाण यांच्या कानातील बाळी ओरबडून काढल्याने त्यांना दुखापत झाली आहे. समाधान चव्हाण यांच्या लहान बाळाच्या गळ्यावर तलवार लावत दहशत निर्माण करत सारा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेल्याची माहिती दरोडा पडलेल्या घरातील कुटुंबियांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांची चव्हाण यांच्या घराकडे धाव घेतली. मात्र दरोडेखोर पसार झाले. अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, एपीआय चंद्रसेन पालकर, फौजदार डोमाळे, गुन्हे शाखेचे लक्ष्मण पाटील, कजगाव पोलीस चौकीचे नरेंद्र विसपुते यांचेसह भडगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. ठसे तज्ञांच्या पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. पोलिसांकडून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/cSwljgu
No comments:
Post a Comment