म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहरातील सिग्नल तोडणे असो अथवा रस्त्यात सतत बस बंद पडणे. कधी बंदी असलेल्या रस्त्यावरून बस दामटविणे... अशा वारंवार घटना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस चालकांकडून घडत आहेत. या गोष्टींचा फटका सर्व सामान्य नागरिकांना बसत असून, वाहतूक कोंडी भर पडत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियभंग करणाऱ्या दोन्ही संस्थांच्या बसवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये ३११ बसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.पुण्यात सकाळ व सायंकाळी अनेक रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या जाणवते. शहरात खासगी वाहनांची संख्या वाढत असून अनेकजण वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नसल्यामुळे त्या कोंडीत भर पडते. अशा खासगी वाहन चालकांवर वाहतूक पोलिस सीसीटीव्हीच्या माध्यमातून अथवा चौकात उभे राहून कारवाई करतात. पण, शहरात अनेक वेळा पीएमपी आणि चालक बेदरकारपणे बस चालवतात. या बस सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगवर उभ्या केल्या जातात. बसचालकांकडून सर्रास सिग्नल तोडले जातात. बस थांब्यावर उभी न करता ती रस्त्यात उभी केल्याने वाहतूक कोंडी होते; पण, या बस सरकारी असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याची ओरड नागरिकांकडून केली जात होती. या बसचालकांकडून नियभंगाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांपासून एसटी व पीएमपी बस सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाईला सुरुवात केली आहे. आठ दिवस ही मोहीम सुरू राहणार आहे.एसटी बसवर नजरराज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचे चालक बंदी असलेल्या टिळक, बाजीराव रस्त्यांवरून बस घेऊन जात असल्याचे वारवार दिसून आले आहे; तसेच, त्यांच्याकडून अनेकदा शहारातील सिग्नल पाळले जात नाहीत. वेळेत पोहोचण्याच्या नादात सिग्नल तोडले जातात. पहाटेच्या वेळी कधी-कधी काही रस्त्यावर विरुद्ध दिशेने बस चालवित असल्याचे दिसून आले आहे. आता एसटी बसवर पोलिसांची नजर राहणार आहे.पीएमपी आणि एसटी बसचे चालक वाहतुकीचे नियम पाळत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. सर्वसामान्य वाहनचालकांना तोच नियम या बसचालकांनाही लागू आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.- विजयकुमार मगर,उपायुक्त, वाहतूक शाखा
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/0t8Q9eI
No comments:
Post a Comment