Breaking

Wednesday, November 29, 2023

मुंबईत पोलीस ठाण्यातच ओली पार्टी; व्हिडिओ व्हायरल, चार पोलिसांवर कारवाई https://ift.tt/0frAxVU

मुंबई: खुद्द पोलीस ठाण्यातच ‘ओली पार्टी’ करण्याचा धक्कादायक प्रकार भांडुप पोलीस ठाण्यात घडला आहे. भांडुप पोलिसांच्या या गैरकृत्याची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्तांनी चार पोलिसांना निलंबित केले आहे. पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. भांडुप पोलीस ठाण्यातील पोलिस निरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) हे २५ ऑक्टोबर रोजी त्यांच्या दालनात हजर नसताना तेथे सहायक फौजदार सुनील कंक, कॉन्स्टेबल शैलेश पाटोळे, मनोहर शिंदे बसले होते. यावेळी निरीक्षकांचे मदतनीस कॉन्स्टेबल प्रेमचंद सावंत हे देखील उपस्थित होते. सावंत हे त्यांचे दैनंदिन काम करीत असताना कंक, पाटोळे आणि शिंदे हे ‘ओली पार्टी’ करत होते. पोलीस ठाण्यातील त्यांच्या या कृत्याची चित्रफीत पोलीस उपायुक्तांपर्यंत पोहोचली. पोलीस दलाची प्रतिमा डागाळणारी ही कृती असल्याने उपायुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेत याबाबत चौकशी करण्याचे आदेश सहायक पोलीस आयुक्तांना दिले.सहायक पोलीस आयुक्तांनी चित्रफितीची शहानिशा केली. तसेच कंक, पाटोळे आणि शिंदे यांची कसून चौकशी केली. २५ ऑक्टोबरच्या दुपारी दोनच्या सुमारास हे तिघे नेमके कुठे आणि काय करत होते. याबाबत पडताळणी केल्यानंतर या सर्वांनी गैरकृत्य केल्याचा अहवाल सहायक पोलीस आयुक्तांनी दिला. या अहवालाच्या आधारे गैरकृत्याबद्दल तिघांना निलंबित करण्यात आले. तसेच गैरकृत्य करताना न रोखल्याने तसेच या कृतीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना न दिल्याने प्रेमचंद सावंत यांना निलंबित करण्यात आले. कंक, सावंत आणि शिंदे यांनी २३ तर पाटोळे यांनी २७ नोव्हेंबर रोजी त्यांच्या निलंबनाचे आदेश स्वीकारले. दरम्यान तंबाखूजन्य पान मसाला आणि गुटखाविक्रीस महाराष्ट्रात बंदी आहे. मात्र, नायगाव येथे सशस्त्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला कॉन्स्टेबल मोसिम शेख हाच गुटख्याच्या तस्करीत गुंतल्याचे समोर आले. खासगी वाहनाला ‘पोलिस’ असा फलक लावून शेख हा गुटख्याची तस्करी करताना आढळला. पालघरच्या कासा पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर सशस्त्र दलाच्या उपायुक्तांनी शेख याला पोलीस सेवेतून निलंबित केले. शेख याच्याकडून सुमारे २ लाख ८५ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/hgd0OM2

No comments:

Post a Comment