Breaking

Monday, November 27, 2023

पाण्यासाठी राष्ट्रपतींना साकडे; वैधानिक विकाससाठी आग्रह, मराठवाडा जनता विकास परिषदेच्या बैठकीत चर्चा https://ift.tt/demS15i

लातूर: समन्यायी पाणी वाटप धोरण एखाद्या वर्षापुरते अंमलात न आणता मराठवाड्याच्या शाश्वत पाण्यासाठी ते कायमस्वरुपी राबवावे, अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या मराठवाडास्तरीय बैठकीत रविवारी येथे करण्यात आली. वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्स्थापनेसाठी आता थेट राष्ट्रपतींचेच दरवाजे ठोठावण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. गोदावरी उर्ध्व खोऱ्यातून मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतला, हे अभिनंदनीय असले तरी हे दुखणे कायमस्वरुपी मिटण्याची गरज आहे. त्यासाठी बैठकीत आग्रह धरण्यात आला. माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. विदर्भ, तसेच कोकण, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील अतिरिक्त असलेले जवळपास ६७ दलघमी पाणी मराठवाड्याकडे वळविण्यासाठी इथल्या लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याबरोबरच व्यापक जनआंदोलनाचीही आवश्यकता आहे, अशी पुस्तीही परिषदेने जोडली. मराठवाडा विकासाची श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असून या संदर्भातील जबाबदारी ॲड. भारत साबदे (लातूर) आणि प्राचार्य के. के. पाटील (परभणी) यांच्यावर सोपविण्यात आली.मराठवाड्यातील सिंचन, शिक्षण, आरोग्य, उद्योग आदी सर्वच क्षेत्रांत प्रचंड अनुशेषाचे डोंगर उभे आहेत. मराठवाड्याशी संबंधित काही योजनांना केंद्र सरकारने निधीची तरतूद केली असली, तरी राज्य सरकार आपला वाटा देत नाही. केवळ सिंचनाचाच अनुशेष सुमारे ४० हजार कोटींचा असल्याचे डॉ. काब्दे म्हणाले. मराठवाड्यातील प्रलंबित प्रश्नांसाठी आमदार आणि खासदारांवर दबाव आणण्याची गरज असून २०१० नंतरचा अनुशेष काढण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले. परिषदेच्या कामकाजात महिलांचा सहभाग वाढविण्याची सूचनाही त्यांनी केली. अनुशेषाचा पुनर्विचार करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्याची मागणी बैठकीत अभ्यास गटप्रमुख ॲड. भारत साबदे यांनी केली. सरचिटणीस प्राचार्य देसाई यांनी अहवालाचे वाचन केले. प्रारंभी मजविप लातूर महानगर शाखेचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांनी स्वागत केले. येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या व्होकेशनल सभागृहात झालेल्या या बैठकीस परिषदेचे सरचिटणीस प्राचार्य जीवन देसाई, माजी आमदार डी. के. देशमुख, उपाध्यक्ष डॉ. सोमनाथ रोडे, सुमंत गायकवाड, डॉ. अशोक सिद्धेवाड, बसवेश्वरचे प्राचार्य डॉ. गवई, डॉ. अशोक बेलखोडे, डॉ. मोहन फुले, मराठवाड्यातील प्रश्नांचे अभ्यासकद्वय ॲड. भारत साबदे आणि प्राचार्य के. के. पाटील यांच्यासह संपूर्ण मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव व बीड जिल्ह्यातून उपस्थिती होती. मराठवाडा जनता विकास परिषदेची लातूर महानगर शाखा यजमान असलेल्या या बैठकीच्या प्रारंभी दिवंगत प्राचार्य प्रतापराव बोराडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून अभिवादन करण्यात आले.लातूरमध्ये झालेल्या मराठवाडा जनता विकास परिषदेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. चर्चेत डॉ. मोहन फुले, माजी आमदार देशमुख, प्रदीप नागापूरकर, संभाजी शिंदे, प्रा. एस. एस. पाटील, रेल्वे प्रश्नाचे अभ्यासक मोतीलाल डोईजोडे व श्यामसुंदर मानधना, सुमंत गायकवाड, प्रा. अर्जुन जाधव, भाऊसाहेब मोरे, भाऊसाहेब हाके, डॉ. अशोक बेलखोडे, डॉ. सिद्धेवाड, वाकडे, डॉ. थोरात, संभाजी शिंदे, भरत राठोड, किशोर जैन, प्रा. बी. एस. पळसकर, अनंत आचार्य, डॉ. खडके, डॉ. सिंगापुरे आदींनी सूचना केल्या.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/UxYQZf3

No comments:

Post a Comment