Breaking

Sunday, November 5, 2023

लेक शाळेला गेली ती पुन्हा परतलीच नाही, १५ महिन्यांनी सापडली चिमुकल्यासह; नेमकं काय घडलं? https://ift.tt/SvgMqu6

जालना: जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील दावलवाडी येथील एक १५ वर्षीय मुलगी शेलगाव येथील प्रशालेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. मागील वर्षी ८ ऑगस्ट २०२२ रोजी ही मुलगी नेहमीप्रमाणे अप-डाऊनसाठी लावलेल्या ऑटो रिक्षाने गावातून शाळेत गेली होती. ती परतलीच नाही. त्या दिवशी श्रावण सोमवार असल्यामुळे दुपारीच शाळा सुटली. पण उशिरापर्यंत मुलगी घरी आली नसल्याने तिच्या आईने सर्वत्र शोध घेतला. शाळेतील सरांकडे चौकशी केली असता ती शाळेतच आली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. शाळेत जाण्यासाठी ती ज्या मुलींसोबत ऑटोरिक्षाने अपडाऊन करायची त्या मुलींना विचारले असता मुलींनी ती आमच्यासोबत शेलगाव येथे आली होती. मात्र काम असल्याचे सांगून शाळेत आली नव्हती असे त्यांनी सांगितले. अखेर बराच शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने तिच्या आईच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपासासाठी अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटकडे वर्ग करण्यात आला होता. या मुलीचा शोध घेण्यासाठी युनिटच्या वतीने अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र तिचा थांगपत्ता लागत नव्हता. पण पोलिसांचा तपास सुरू असताना गावातील २३ वर्षीय अजय कडूबा जाधव हा खाजगी वाहन चालक तरुण गायब असल्याची माहिती तपासात समोर आली. गायब झाल्यापासून अजय जाधवचा मोबाईल क्रमांक कायमस्वरूपी बंद होता. त्यामुळे त्याचा शोध घेणे पोलिसांना अवघड झाले होते. मागील आठवड्यात त्या मुलीच्या आईच्या मोबाईलवर गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या लसीकरण आणि उपचारासंदर्भात तारखेचा एक संदेश मुलीच्या नावासह प्राप्त झाला. त्यामुळे पोलिसांच्या तपासाला वेगळी दिशा मिळाली. मुलीच्या आईने आलेल्या संदेशाची माहिती युनिटच्या पोलिसांना देताच पोलिसांनी तातडीने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संपर्क करून त्या संदेशाची पडताळणी करत माहिती काढली. त्यानुसार पुण्यातील यशवंतराव चव्हाण शासकीय रुग्णालयात स्त्री रोगतज्ञ डॉ. मीनल बिल्लेवार त्या मुलीवर उपचार करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आवश्यक ती माहिती हाती येताच पोलीस पथकाने तातडीने पुणे येथे जाऊन ते रुग्णालय गाठले. पूर्ण रेकॉर्ड तपासले असता दावडा मळा, चाकण एमआयडीसी अशा पत्याची नोंद आढळून आली. सरकारी रुग्णालयात गरोदर मातेची ऑनलाईन नोंदणी करताना त्या मुलीकडून घाईगडबडीत आईचा मोबाईल नंबर देण्यात आला होता. त्यावरच आलेल्या मेसेजने पोलिसांना तिचा शोध घेण्यास मोठी मदत झाली. आज पहाटे पोलिसांनी शोध घेत नोंदवलेल्या पत्यावर धाव घेतली. त्या मुलीचा पत्ता गाठल्यावर पोलिसही चक्रावून गेले. कारण त्या मुलीने प्रियकर अजय जाधव याच्यासोबत भाड्याने खोली घेऊन संसार थाटला होता. त्यांना मागील आठवड्यात २८ ऑक्टोबर रोजी एक गोंडस मुलगा झाल्याचे समोर आले. ही अल्पवयीन मुलगी, तिचा प्रियकर आणि त्या गोंडस बाळाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना जालना येथे आणल्यानंतर दुपारी बदनापूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/rYVFQoL

No comments:

Post a Comment