रायगड: महाड एमआयडीसीतील दुर्घटनास्थळी आज तिसऱ्या दिवशी सलग रेस्क्यू ऑपरेशन युद्ध पातळीवर सुरू आहे. रायगड जिल्हा प्रशासनाने या सगळ्याची गंभीर दखल घेऊन कंपनी प्रशासनाला सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान या सगळ्या संदर्भात ब्लू जेट फार्मासिटिकल या औषधनिर्मिती करणाऱ्या कंपनी प्रशासनाला या ठिकाणी कोणत्या स्वरूपाचे केमिकल वापरण्यात आले होते. रेस्क्यू करताना दिसत असलेले ड्रम हे नक्की कोणत्या स्वरूपाचे केमिकल आहेत, त्याचं नाव काय? त्याचा ज्वालाग्रही बिंदू कोणता? याचे सविस्तर माहिती देण्याचा आदेश देण्यात आले आहेत. दुर्घटना घडली त्यावेळेला नेमके या ठिकाणी कोणते प्रोडक्शन घेतले जात होते. या सगळ्या संदर्भात तात्काळ माहिती देण्यात यावी जेणेकरून हे रेस्क्यू ऑपरेशन अधिक सुलभ पद्धतीने करता येईल, असं स्वरूपाची कान उघडणी करणारे खरमरीत पत्रच रायगड जिल्हा प्रशासनाकडून महाडचे प्रांताधिकारी डॉ. ज्ञानोबा बनापुरे यांच्या सहीने कंपनी प्रशासनाला देण्यात आले आहे, अशी माहिती रायगड जिल्हा प्रशासनातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. ५ नोव्हेंबर रोजी रविवारी हे पत्र देण्यात आल्याची माहिती उच्चपद सूत्रांनी दिली असून त्याला प्रशासनातील एका अधिकाऱ्यानेही दुजोरा दिला आहे. या दुर्घटनेनंतर या तीन मजली इमारतीत दोन स्लॅब अर्धवट स्थितीत पडले आहेत. तर या ठिकाणी केमिकल सॉल्व्हंटचे ड्रम आहेत. हे ड्रम सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी पुण्यातील एनडीआरएफ टीम प्रयत्न करत आहे. दुर्घटना घडून तीन दिवस झाल्यानंतरही यासंबंधीची कोणतीही माहिती पुणे येथील एनडीआरएफ टीम अथवा जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेली नाही. त्यामुळे अखेर रायगड जिल्हा प्रशासनाकडून कंपनी प्रशासनाला लेखी पत्र देऊन ही माहिती तात्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/jhTe7Hs
No comments:
Post a Comment