पनवेल: पनवेल महापालिकेच्या भरतीप्रक्रियेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ३७७ जागांसाठी ८ ते ११ डिसेंबरदरम्यान राज्यभरात २१ जिल्ह्यांमधील ५७ केंद्रांवर विविध पदांची लेखी परीक्षा होणार आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाणार आहे. पारदर्शक परीक्षा प्रक्रियेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असा विश्वास उपायुक्त कैलास गावडे यांनी व्यक्त केला. पदभरतीसाठी आवश्यक आकृतिबंध मंजूर करून घेतल्यानंतर पनवेल महापालिका प्रशासनाने वेगाने सूत्रे हलवून पदभरती करण्याची परवानगी राज्य सरकारकडून मिळवली. मागील काही महिन्यांपासून महापालिका प्रशासनाचा आस्थापना विभाग ही भरतीप्रक्रिया राबविण्याची तयारी करीत आहे. ४१ संवर्गांतील वर्ग १ ते वर्ग ४पर्यंतच्या पदांच्या भरतीप्रक्रियेची जबाबदारी राज्य सरकारच्या नियमानुसार पनवेल महापालिकेने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या खासगी कंपनीला दिली आहे. भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत दिल्यानंतर राज्यभरातून तब्बल ५४ हजार ५५८ उमेदवारांनी ३७७ जागांसाठी अर्ज केले. यावरूनच महापलिकेच्या भरतीत तीव्र स्पर्धा होणार, हे निश्चित झाले आहे. ८ डिसेंबरपासून लेखी परीक्षेला सुरुवात होत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील उमेदवाराला परीक्षा देणे सोयीचे जावे म्हणून २१ जिल्ह्यांमध्ये ५७ केंद्रात परीक्षा घेतली जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर महापालिका वर्ग २चा एक अधिकारी, एक लिपिक आणि एक शिपाई देण्यात येणार आहे. चार दिवस सकाळी आठ ते ११, दुपारी १ ते ३ आणि सायंकाळी ५ ते ७ यावेळीत परीक्षा होईल. परीक्षेपूर्वी आठ दिवस आधी उमेदवारांना एसएमएस पाठवून परीक्षा वेळेची माहिती दिली जाणार आहे. ५७ केंद्रांतील वेगवेगळ्या प्रत्येक खोलीमध्ये जॅमर बसविण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या बेल आणि ईसीआयएल कंपनीकडून महापालिकेने जॅमर घेतले आहेत. जॅमर बसविल्यानंतर २४ मीटरच्या परिसरात मोबाइल किंवा इतर कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू चालणार नाही. उमेदवारांकडून सुक्ष्म इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर केला जात असल्याचे समोर आल्यामुळे ही काळजी घेण्यात आली आहे. जॅमर लावण्यासाठी आवश्यक परवानगीची प्रक्रिया सुरू आहे.राज्यभर होणाऱ्या परीक्षेसाठी महापालिकेतील सहा उपायुक्तांना कोकण, खान्देश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचे दोन भाग अशा सहा भागांची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक भागाची जबाबदारी एका उपायुक्तांवर देण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्थेसाठी महापालिकेच्या खर्चातून प्रत्येक केंद्रावर दोन महिला आणि दोन पुरुष असे चार पोलिस कॉन्स्टेबल दिले जाणार आहेत. जिल्ह्यातील पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि महावितरणला परीक्षेत अडथळे येणार नाही, यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे. लेखी परीक्षेत मिळालेले गुण उमेदवाराच्या निवडीसाठी अंतिम ठरणार आहेत. त्यामुळे परीक्षा जास्तीत जास्त पारदर्शक होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच उमेदवारांनी याची माहिती कळवली जाईल, असं आस्थापना विभागाचे उपायुक्त कैलास गावडे म्हणाले आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/v09nsqa
No comments:
Post a Comment