मुंबई: अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी विविध स्तरांवर होणाऱ्या जनजागृतीचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. पाच वर्षीय दिव्यांग मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या पालकांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्याने डोळे, हृदय, किडनीची गरज असलेल्या तीन गरजू रुग्णांना नवे आयुष्य जगता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ५ वर्षीय स्मृतीची (नाव बदलले आहे) काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली. तिला सतत उलट्या होत होत्या. वैद्यकीय उपचारासाठी तिला पालकांनी रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्याने तिला २२ नोव्हेंबर रोजी वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी डॉक्टरांनी तिला मेंदूमृतावस्थेत (कोमा) असल्याचे जाहीर केले. त्याची कल्पनाही कुटुंबीयांना दिली. सुरुवातीच्या धक्क्यानंतर पालकांनी वस्तुस्थिती स्वीकारली. या वेळीच झाल्यास गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकेल, अशी माहिती समुपदेशकांनी दिली. रुग्णालयातील समन्वयकांनी पालकांना अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले. या मुलीच्या डोळ्यांचे दान केल्यास दृष्टिहीन बालरुग्णाच्या आयुष्यात प्रकाश पसरेल, याची जाणीव करून दिली. समुपदेशनानंतर पालकांचा दृष्टिकोन बदलला. त्यांनी त्या मुलीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. स्मृतीचे हृदय दिल्लीला प्रत्यारोपणासाठी पाठवण्यात आले. एक किडनी केईएममध्ये तर दुसरी ठाण्यातील रुग्णालयामध्ये पाठवण्यात आली. या दिव्यांग मुलीने आयुष्याचा निरोप घेता घेता तीन जणांना नव्या आयुष्याची भेट दिली. ‘मृत्यूनंतरही लेकीने केलेल्या अवयवदानामुळे ती खऱ्या अर्थाने जीवन जगली’, अशी भावना तिच्या पालकांनी व्यक्त केली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/uEqmrxe
No comments:
Post a Comment