मुंबई: कल्याण येथे नेऊन दोन लाखांमध्ये विक्री करण्यासाठी तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या तिघांना वडाळा पोलिसांनी अटक केली. सानिका वाघमारे, पवन पोखरकर आणि सार्थक गोमणे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहे. दोन लाख रुपये मिळाले नसल्याने हा अपहरणाचा प्रयत्न फसल्याचे उघड झाले आहे. शिवडी येथे वास्तव्यास असलेल्या सुमन चौरसिया यांचा तीन वर्षांचा मुलगा सोमवारी घराबाहेर खेळता-खेळता गायब झाला. मुलगा सापडत नसल्याने सुमन यांनी वडाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली. लहान मुलगा बेपत्ता झाल्याचे पाहून पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत अपहरणाचा गुन्हा दाखल केला. एका बाजूला पोलिसांचा तपास सुरू असताना दुसरीकडे आपल्या मुलाला सानिका हिच्यासोबत जाताना काही जणांनी पाहिल्याचे सुमन यांना समजले. सुमन यांनी तत्काळ सानिकाला फोन केला. तिने आपण कॉलेजात असल्याचे पोलिसांना सांगितले.प्रत्यक्षात सानिका हिनेच चौरसिया यांच्या मुलाचे अपहरण केले होते. तिने त्या मुलासह घाटकोपर गाठले. तेथे पवन आणि सार्थक याला भेटली. त्याच टॅक्सीने मुलाला विकण्यासाठी सर्वजण कल्याण येथे पोहोचले. सानिका हिने मुलाच्या बदल्यात दोन लाखांची मागणी त्यांच्याकडे केली. मात्र तिला लगेच पैसे देण्यास पवनने नकार दिला. आधीच मुलाच्या पालकांना समजल्याने पोलिसांत धाव घेतली होती. त्यातच दोन लाख रुपये मिळाले नसल्याने सानिका त्या मुलाला घेऊन पुन्हा शिवडीत आली. सानिकाने चौरसियांच्या मुलास परिचयातील एका व्यक्तीकडे दिले. तो मुलगा बेवारस सापडल्याचे तिने त्यांना सांगितले. या व्यक्तीने मुलास घेऊन वडाळा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी मुलाकडे चौकशी केली, त्यावेळी त्याने सानिकाचे बिंग फुटले. त्या तीन वर्षांच्या मुलाने आपण सानिका हिच्यासोबत होतो, असे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी प्रथम सानिकाला ताब्यात घेतले. तिने पवनच्या सांगण्यावरून तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याची कबुली तिने दिली. अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांनी घाटकोपरच्या पवन आणि सार्थक या दोघांना अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी दिली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/pnm7jqY
No comments:
Post a Comment