म. टा. प्रतिनिधी, मुंबई: नाताळनिमित्त वांद्रे-माऊंट मेरी फिरून गेटवे ऑफ इंडिया आणि मरिन लाइन्सकडे येणाऱ्या प्रवाशांच्या आनंदावर सोमवारी लागू करण्यात आलेल्या रविवारच्या वेळापत्रकामुळे विरजण पडले. सुट्टीच्या वेळापत्रकामुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द होत्या. तर, विलंबाने धावणाऱ्या लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने सहकुटुंब फिरणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.वर्षातील शेवटचा आठवडा असल्याने अनेकांनी फिरण्याचे बेत आखले आहेत. यामुळे शहरातील गेटवे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, बँडस्टँड, माऊंट मेरी, वांद्रे रिक्लेमेशन, दादर सी-५, नारळी बागेत मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. नाताळच्या निमित्ताने वांद्रे परिसरात नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली आहे. तिथे पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. दादर आणि गिरगाव चौपाटीवरही पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. 'वीकेंडला जोडून आलेल्या नाताळमुळे माऊंट मेरीनंतर महालक्ष्मी, गेटवे आणि मरिन ड्राइव्ह सहकुटुंब फिरण्याचे नियोजन अनेकांनी केले होते. यासाठी काहींनी रस्त्यावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी वातानुकूलित लोकलचे तिकीट काढून प्रवास करण्याचे ठरवले. मात्र ही लोकल २० मिनिटे विलंबाने आली. त्यामुळे यात प्रवेश करण्यासाठी धक्काबुक्की झाली. किमान सुट्टीचा दिवस लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने जादा फेऱ्या चालवणे आवश्यक आहे', अशी प्रतिक्रिया रमेश पाटील यांनी दिली. तर, 'महिला प्रवाशांची संख्या वाढती असताना लोकलमधील महिला आसनक्षमतेत वाढ झालेली नाही. सुट्टीच्या वेळापत्रकात तर यामुळे प्रचंड त्रास होतो. प्रशासनाने रविवारचे वेळापत्रक लागू करण्याची प्रथा बंद करून नियमित वेळापत्रकानुसारच लोकल चालवाव्यात', अशी संतप्त प्रतिक्रिया श्रृती शिंदे यांनी व्यक्त केली.मुंबईतील चौपाट्यांसह पर्यटनस्थळी फिरण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर आल्यावर सुट्टीच्या वेळापत्रकानुसार लोकल वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. नियमित वेळापत्रकाच्या तुलनेत सुट्टीच्या दिवसात शेकडो लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतात. तसेच सेवेत असलेल्या लोकलही विलंबाने धावत असतात.फेरविचाराचे आश्वासन हवेतच!सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी शहरातील केंद्र व राज्य सरकारी कार्यालयांना सुट्टी असते. नोकरदार प्रवाशांची संख्या कमी असल्याने या दिवशी रविवारचे वेळापत्रक लागू करण्यात येते. याअंतर्गत काही लोकल गाड्यांची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. यामुळे फेऱ्या रद्द करण्यात येतात, असे स्पष्टीकरण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले. दरम्यान, विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी सुट्टीचे वेळापत्रक लागू करण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. Read And
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/4BvtFLV
No comments:
Post a Comment