भुवनेश्वर: अल्टीमेट खो-खो लीगच्या सीझन दोनमधील आजच्या सामन्यात गुजरात जायंट्सने मुंबई खिलाडीसचा ४ गुणांनी पराभव करत गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले. ओडिशा जगरनॉट्स व चेन्नई क्विक गन्स यांच्यात झालेला सामना बरोबरीत सुटला.आज झालेल्या पाचव्या सामन्यात गुजरात जायंट्सने मुंबई खिलाडीसला ३४-३० (मध्यंतर १७-९) असे ४ गुणांनी पराभूत केले. मुंबई खिलाडीसचा कर्णधार अनिकेत पोटेने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण घेतले. हा त्याचा निर्णय अतिशय योग्य ठरवत मुंबई खिलाडीसच्या संरक्षकांनी अतिशय उत्कृष्ट खेळ करत पहिल्या टर्नमध्ये संरक्षणात ड्रीम रन्सचा १ गुण मिळवला. तर गुजरात जायंट्सने १४ गुण मिळवत खेळावर पकड मिळवली. त्यानंतर गुजराताने ड्रीम रन्सचे तीन गुण वसूल करताना मुंबई खिलाडीसला कडवी लढत दिली. मात्र या दुसऱ्या टर्नमध्ये मुंबई खिलाडीसला फक्त ८ गुणच मिळवता आले. यावेळी गुजरात कर्णधार अक्षय भांगरे १,१२ मि. संरक्षण सुयश गरगटे १.४८ मि. संरक्षण व अभिनंदन पाटील यांनी उत्कृष्ट संरक्षण केले. दुसऱ्या डावात व तिसऱ्या टर्न मध्ये धमाकेदार खेळ करत गुजरातने मुंबईला तगडे आव्हान देत एक एक पाउल विजयाकडे टाकत होते. गुजरातने एकूण ३४ गुण वसूल केले. त्यामुळे मुंबईची वाटचाल बिकट झाली. शेवटच्या टर्न मध्ये मुंबई खिलाडीसने जोरदार मुसंडी मारत सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात ते सपशेल अपयशी ठरले. आज झालेल्या सामन्यात ओडिशा जगरनॉट्स व चेन्नई क्विक गन्स यांच्यात झालेला सामना ३४-३४ (मध्यंतर १६-१६) असा बरोबरीत सुटला. सुरवातीपासूनच अतिशय चुरशीने खेळलेल्या सहाव्या सामन्यात चेन्नई क्विक गन्सने नाणेफेक जिकून ओडिशा जगरनॉट्स विरुध्द संरक्षण घेतले. ओडिशा जगरनॉट्सने पहिल्या आक्रमणात १६ गुण मिळवत सामन्यावर पकड मिळवण्याचा प्रयत्न केला. तर चेन्नई क्विक गन्सने ड्रीम रन्सचे २ गुण मिळवत कडवी लढत दिली. रामजी कश्यपने जोरदार आक्रमण करत आपल्या संघाला सामन्यात जिंकण्याची संधी मिळवून देण्यात यश मिळवले व मध्यंतर १६-१६ गुणावर थाबला. यावेळी ओडिशाच्या गौतम एम के चे संरक्षण उत्कृष्ट झाले. मध्यंतरा नंतर ओडिशा जगरनॉट्सने जोरदार आक्रमण करत रोहन शिंगाडे, अविनाश देसाई यांच्या आक्रमणाच्या जोरावर १८ गुण वसूल केले. तर चेन्नई क्विक गन्सच्या लक्ष्मण गवस व दुर्वेश साळुंके यांनी दमदार संरक्षण करत ओडिशा जगरनॉट्सच्या तोंडाला फेस आणला. ४ थ्या व शेवटच्या टर्न मध्ये जवळजवळ चेन्नई क्विक गन्सच्या आक्रमकांनी पहिल्या दीड मिनिटात ६ गुण वसूल केले. त्यानंतर दुर्वेश साळुंके व रामजी कश्यपच्या बहारदार खेळीने हा सामना बरोबरीत सोडवला, मात्र चेन्नई क्विक गन्सला शेवटच्या मिनिटात गुण मिळवण्यात अपयश आल्याने विजयापासून दूर राहावे लागले. बुधवारी तेलुगू योद्धास व राजस्थान वॉरियर्स यांच्यात पहिला सामना तर मुंबई खिलाडीस व ओडिशा जगरनॉट्स यांच्यात दुसरा सामना रंगेल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/xE3MVrS
No comments:
Post a Comment