वृत्तसंस्था, श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवाद्यांनी ७२ वर्षीय निवृत्त पोलिस अधिकाऱ्याची रविवारी गोळ्या झाडून हत्या केली. हे अधिकारी अजान देत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. ते स्थानिक 'मुअज्जिन' होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.मोहम्मद शफी मीर असे त्यांचे नाव असून ते सूर्योदयाआधीच्या प्रार्थनेसाठी उद्घोषणेद्वारे अजान देत असताना त्यांचा आवाज अचानक बंद झाला. त्यांचे शेवटचे शब्द 'रेहम' असे होते, असे त्यांचे चुलत बंधू मोहम्मद मुस्तफा यांनी सांगितले. मीर सन २०१२मध्ये वरिष्ठ पोलिस अधीक्षकपदावरून निवृत्त झाले होते. उत्तर काश्मीर जिल्ह्याच्या शिरी भागात गंतमुल्ला परिसरातील मशिदीत दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, असे पोलिसांनी सांगितले. काश्मीर क्षेत्रीय पोलिसांनीही 'एक्स'वरून या वृत्ताला दुजोरा दिला. मीर स्थानिक 'मुअज्जिन' होते. ते मशिदीत आपले कर्तव्य बजावत असत, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. अजानद्वारे नागरिकांना प्रार्थनेसाठी बोलावण्याचे काम मुअज्जिन करतात. घटनेनंतर मीर यांचे निवासस्थान आणि मशिद परिसरात स्थानिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. मीर यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या, असा दावा मीर यांच्या काही नातेवाईकांनी केला आहे. राजकीय पक्षांनी या घटनेचा निषेध केला आणि मीर यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला. 'ही हिंसा कदापि सहन करता येणार नाही,' असे नॅशनल कॉन्फरन्सकडून सांगण्यात आले. तर, केंद्राद्वारे सामान्य स्थितीचा देखावा कायम ठेवण्याची किंमत निर्दोष लोकांना मोजावी लागत आहे, अशी टीका पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी केली.नागरिकांच्या मृत्यूची चौकशीनवी दिल्ली : जम्मू व काश्मीरमधील पूंछ येथे लष्कराच्या वाहनांवर झाल्यानंतर कथितपणे ताब्यात घेतलेल्या तीन नागरिकांच्या मृत्यूप्रकरणी लष्कराकडून सखोल अंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. लष्कराच्या छळामुळेच या नागरिकांचे प्राण गेल्याचा आरोप करण्यात आला होता. पूंछमध्ये अज्ञात दहशतवाद्यांनी २१ डिसेंबरला केलेल्या हल्ल्यात पाच जवान हुतात्मा झाल्यानंतर आठ नागरिकांना लष्कराने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी यातील तिघे चकमकस्थळी मृतावस्थेत आढळले होते. कोठडीतील छळामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांचे नातेवाईक व काश्मीरमधील प्रमुख राजकीय पक्षांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी सांगितले. जम्मू-काश्मीर पोलिसही या मृत्यू प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, याप्रकरणी चौकशीस पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन लष्कराने दिले आहे.ड्रोनमधून शस्त्रे, रोकडजम्मू : जम्मूच्या अखनूर प्रांतात नियंत्रण रेषेजवळ रविवारी लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त मोहिमेदरम्यान ड्रोनने टाकलेली शस्त्रे आणि रोख रकमेची दोन पाकिटे जप्त करण्यात आली. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. पाकिस्तानी ड्रोनद्वारे विध्वंसक कारवायांसाठी ही पाकिटे टाकली, असे समजले जात आहे. ती सकाळी ७.५०च्या सुमारास खौर भागातील चन्नी दिवानो गावात एका मोकळ्या मैदानात पडलेली दिसली. लष्कर आणि पोलिसांनी तत्काळ संयुक्त कारवाई सुरू केली आणि बॉम्ब निकामी पथकाच्या मदतीने पाकिटे उघडण्यात आली. यातून शस्त्रे आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/OSPW8Ks
No comments:
Post a Comment