सातारा: शहरातील कमानी हौद परिसरात मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास सहा जणांच्या टोळीने दोघांना मारहाण करत फायरिंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणी गंभीर जखमी झाले नसून परिसर मात्र भीतीने हादरून गेला. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी दोन पुंगळ्या आणि दोन जिवंत राउंड सापडले आहेत. संशयित हल्ल्यानंतर पसार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, धीरज ढाणे, हर्षद शेख (दोघे रा. मंगळवार पेठ, गुरुवार पेठ, सातारा) आणि अनोळखी चौघे असे हल्लेखोरांची नावे असून याप्रकरणी विशाल अनिल वायदंडे (२७, रा. शनिवार पेठ, सातारा) या युवकाने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना २८ रोजी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. विशाल वायदंडे हा युवक शेटे चौकातून दुचाकीवरून कमानी हौदाकडे निघाला होता. त्याची दुचाकी डंग्या मारुती मंदिर परिसरात आली असता तेथे हर्षद शेख याने दुचाकी रस्त्यावर आडवी लावली होती. यामुळे विशाल याला जाण्यास अडचण होत असल्याने त्याने हर्षद याला दुचाकी बाजूला घे, असे म्हणाला. या कारणावरुन हर्षदने वाद घातला. दोघांमध्ये काहीवेळ वाद झाल्यानंतर विशाल तेथून पुढे गेला.या घटनेनंतर हर्षद चिडला होता. त्याने फोन करून धिरज ढाणे याच्यासह त्याच्या इतर साथीदारांना बोलावले. तोपर्यंत विशाल पुन्हा तेथून जाण्यासाठी दुचाकीवर आला असता हर्षदने पुन्हा विशाल याला थांबण्यास सांगितले. विशालचा आणखी एक मित्र तेथे होता. यामुळे विशाल त्याच्या मित्राबरोबर बोलत थांबला. हर्षदने पुन्हा फोन करून त्याच्या साथीदारांना बोलावले. हर्षदने बोलवल्याप्रमाणे धिरज आणि त्याचे साथीदार गोळा झाल्यानंतर त्यांनी विशालकडे मोर्चा वळवला. यावेळी विशालच्या मित्राने सर्वांना थांबण्याची विनंती केली. मात्र, संशयित सर्व युवकांनी विशाल आणि त्याच्या मित्रालाही दमदाटी, शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. वर्दळीच्या भर रस्त्यावर मारहाणीला सुरुवात झाल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याचवेळी धिरज ढाणेने त्याच्याकडील पिस्टल काढले. यामुळे विशाल घाबरला. त्याने बचावासाठी तेथून पळ काढला. मात्र, तोपर्यंत धिरज याने जीवे मारण्याच्या उद्देशाने दोन वेळा फायर केले. फायर झाल्याने परिसरातील नागरिक घाबरले. काही जण काय झाले? हे पाहण्यासाठी घरातून बाहेर आले. यामुळे संशयितांनी तेथून पळ काढला. दरम्यान अद्याप कोणालाही याप्रकरणी ताब्यात घेतलेले नाही.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/rOSgINe
No comments:
Post a Comment