Breaking

Wednesday, December 27, 2023

भुयारी मेट्रो कधी सुरु होणार? गर्दीचा सामना करणारे मुंबईकर संभ्रमात, प्रशासनाने माहिती देणे थांबवले https://ift.tt/3blpjCT

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मेट्रो ३ या भूमिगत मेट्रो मार्गिकेची डेडलाइन हुकून विलंब झाला असल्याने दररोज गर्दीचा सामना करणारे मुंबईकर संभ्रमात आहेत. ही मेट्रो सुरू होण्यास विलंब झाला असताना नियमित मिळणारी माहितीही सोशल मीडियावर मिळणे बंद झाले आहे. विशेष म्हणजे मार्गिकेविषयी माहिती देणाऱ्या एक्सवर १ डिसेंबरनंतर एकही पोस्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबईकरांनी एक्सवरून रोष व्यक्त करत आहेत.मेट्रो ३ ही मुंबई उपनगर व शहराला पश्चिमेकडून उत्तर-दक्षिण जोडणारी मार्गिका आहे. मार्गिकेचा पहिला टप्पा आरे ते प्राप्तीकर कार्यालय (बीकेसी) असा असेल. या मार्गिकेतील गाड्यांच्या दुरुस्तीसाठीचे आरे येथील कारशेड तयार नसल्याने या पहिल्या टप्प्याला आधीच विलंब झाला आहे. त्यानंतरही पहिला टप्पा डिसेंबरमध्ये सुरू होईल, अशी ग्वाही स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. मात्र डिसेंबरमध्ये पहिला टप्पा सुरू झालेला नसून पुढील चार दिवसांत तो सुरू होण्याची शक्यताही कमीच आहे. या परिस्थितीत या मार्गिकेच्या ट्विटर खात्यावरूनही नियमित माहिती (अपडेट्स) मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे मुंबईकरांनी प्रश्न विचारणे सुरू केले आहे.मेट्रो ३ ही मार्गिका रेल्वे कॉर्पोरेशन (एमएमआरसी) विकसित करीत आहे. या कंपनीकडून MumbaiMetro3 हे ट्विटर खाते चालविले जाते. ही मार्गिका डिसेंबरमध्ये सुरू करण्याच्यादृष्टीने या खात्यावर सातत्याने मार्गिकेसंबंधी माहिती दिली जात होती. मार्गिकेसाठी गाडीची चाचणी, आरे कारशेडमधील विविध कामे, नवीन गाडीचे आगमन, स्थानकांची माहिती, मार्गिकेतील किती टक्के काम पूर्ण झाले याबाबतची माहिती, पहिल्या टप्प्यातील स्थानकांच्या आजुबाजूची माहिती आदी नियमितपणे कळविले जात होते. मात्र या अखेरची माहिती १ डिसेंबरला या ट्विटर खात्यावरून देण्यात आली. त्यानंतर अद्याप ही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळेच माहिती देणे बंद का झाले?, मार्गिका नेमकी सुरू तरी कधी होणार?, या प्रश्नांसह सीप्झमधील गर्दी टाळण्यासाठी मार्ग लवकर सुरू करा, असे मुंबईकर सोशल मीडियावरून सांगत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/76dUqt4

No comments:

Post a Comment