म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: 'मालवाहू जहाजांना लक्ष्य केलेल्या हल्लेखोरांचा प्रसंगी समुद्राच्या तळाशी जाऊन शोध घेऊ. या हल्लेखोरांना हुडकून त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई केली जाईल,' अशी ग्वाही संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी येथे दिली.'आयएनएस इंफाळ' ही अत्याधुनिक विनाशिका मंगळवारी नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राजनाथसिंह बोलत होते. अरबी समुद्रासह आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवर काही दिवसांमध्ये हौती दहशतवादी आणि समुद्री चाच्यांकडून हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, राजनाथसिंह म्हणाले, 'भारताचा सामरिक व आर्थिक विकासाचा काही द्वेष्टे तिरस्कार करीत आहेत. त्यातूनच ते भारतीय व्यापाराशी संबंधित जहाजांवर हल्ले करीत आहेत; मात्र नौदल या सर्व प्रकारच्या हल्ल्यांना सडेतोड प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहे. भारताचा व्यापार अवलंबून असलेल्या हिंदी महासागर प्रदेशात भारतीय नौदल हे अन्य सहकारी मित्रराष्ट्रांच्या सहकार्याने समुद्री सुरक्षेचे जाळे विणत या भागातील प्रमुख सुरक्षा प्रदाताच्या भूमिकेत आहे. आपले नौदल या क्षेत्राला सुरक्षित करीत असल्याचा विश्वास असून, आयएनएस इंफाळसारख्या युद्धनौका ताकद वाढविणाऱ्या आहेत.''आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विचार केल्यास भारत हा एक बेट देश आहे. भूगोलाचा विचार केल्यास, भारत व जगादरम्यान समुद्रमार्गे मालवाहतूक होते. पश्चिमेकडील पाकिस्तानी शत्रुत्व व उत्तरेकडील हिमालय, यामुळे तेथून फार व्यापार होऊ शकत नाही. या स्थितीत समुद्री सीमेतून भारताचा सर्वाधिक व्यापार होतो. त्यामुळेच या समुद्री मार्गाच्या संरक्षणासाठी सक्षम नौदल अत्यावश्यक आहे', असेही संरक्षणमंत्री म्हणाले.'युद्ध हे केवळ सैन्यदलांमध्ये होत नाही, तर दोन देशांमध्ये होते. त्यामुळे त्या राष्ट्रांमधील प्रत्येकाचे त्यात योगदान असते. देशातील प्रत्येकाने आपल्या कर्माचा उपयोग राष्ट्रोन्नतीसाठी करावा. सर्वांची एकत्रित ताकद ही जगदंबा मातेप्रमाणे असून सर्वांनीच राष्ट्राच्या विकासासाठी एकत्र यावे.- राजनाथसिंह, संरक्षणमंत्री'विशाखापट्टणम' श्रेणीतील विनाशिका'आयएनएस इंफाळ' ही माझगाव डॉकमध्ये तयार झालेली 'आयएनएस विशाखापट्टणम' श्रेणीतील तिसरी विनाशिका आहे. कुठल्याही रडारमध्ये टिपल्या न जाणाऱ्या या युद्धनौकेचे ७६ टक्के सुटे भाग भारतीय बनावटीचे आहेत. या वेळी नौदलप्रमुख अॅडमिरल आर. हरिकुमार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, युद्धनौका आरेखन विभागाचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल किरण देशमुख, पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल डी. के. त्रिपाठी, खासदार अरविंद सावंत, माझगाव डॉकचे अध्यक्ष संजीव सिंघल, 'आयएनएस इंफाळ'चे पहिले कमांडिंग अधिकारी कॅप्टन कमल चौधरी उपस्थित होते.युद्धनौकांपासून ते हेलिकॉप्टर, टेहळणी विमानांची तैनातीदेशाचे आर्थिक व सामरिक हित असलेल्या अरबी समुद्र व हिंदी महासागर प्रदेशातील सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय नौदल सज्ज आहे. त्यासाठीच तेथे चार युद्धनौकांसह विविध हेलिकॉप्टर, टेहळणी विमाने या सर्वांचीच तैनाती करण्यात आली असल्याचे नौदल प्रमुख व्हाइस अॅडमिरल हरिकुमार यांनी सांगितले.Read And
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/T59gW8Y
No comments:
Post a Comment