नागपूर: महिला तसेच अन्य दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांचे बळजबरीने लग्न लावून देण्यात आले. त्यानंतर त्यांना डांबून ठेवून तिघींवर बलात्कार केल्याची खळबजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध अपहरण, बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार, नंदा पौनीकर, मंगला वरकडे, संतोष (३०), रा. जामनगर (गुजरात), संतोषचे भाऊ गोलू (२१), प्रतीक आणि अन्य, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. काटोल येथे एका महिलेची प्रसुती झाली असून तिची देखभाल केल्यास चांगले पैसे मिळतील, असे नंदाने यशोधरानगर परिसरात राहणाऱ्या २६ वर्षीय विवाहित महिलेला सांगितले. २५ जुलैला नंदा ही पीडित महिला आणि तिच्या चार वर्षीय मुलीसह रेल्वेने काटोलला जायला निघाली. रेल्वेत आधीच नंदाची साथीदार मंगला होती. तिने पीडितेकडील मोबाइल हिसकावला. चार वर्षीय मुलीला ठार मारण्याची धमकी दिली. याचवेळी मंगलासोबत दोन अल्पवयीन मुलीही होत्या. दोघीही त्यांना घेऊन राजकोटला गेल्या. तेथे नंदाचा साथीदार भेटला. त्यानंतर सर्व जण न्यायालयाच्या परिसरात गेले. तेथे दोन अल्पवयीन मुली आणि पीडित महिलेचे तीन पुरुषांसोबत लग्न लावून दिले. कोऱ्या स्टॅम्प पेपरवर त्यांचे ठसेही घेतले. संतोष हा पीडित महिलेला घेऊन जामनगरला आला. त्याने व त्याच्या दोन भावांनी पीडित महिलेला खोलीत डांबले. तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान एका महिलेच्या मदतीने पीडितेने स्वत:ची सुटका केली. मुलीसह नागपूर गाठले. पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेत आपबिती सांगितले. आयुक्तांनी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर गुन्हेशाखा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Gut0Bfm
No comments:
Post a Comment