म. टा. प्रतिनिधी, बीड : बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये एका घरात गर्भलिंगनिदान आणि त्या आधारे बेकायदा गर्भपात करणारे रॅकेट आरोग्य यंत्रणा आणि पोलिसांनी मिळून उघडकीस आणले. या प्रकरणी एका महिलेसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. सोनोग्राफी मशिनसह अन्य काही मशिनही जप्त करण्यात आली आहे. संबंधित महिला बडतर्फ अंगणवाडी सेविका आहे. गर्भपाताचा गोरख धंदा गेवराईमधील संजयनगर परिसरात एका घरात अवैध गर्भलिंगनिदान व गर्भपात होत असल्याची माहिती आरोग्ययंत्रणेला मिळाली. त्या आधारे जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर व जिल्हा शल्य चिकित्सक अशोक बडे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी छापा टाकला. गर्भपातासाठी लागणारी सामग्री व विविध मशिनसह मालकाला व एका महिलेला ताब्यात घेतले. मनीषा सानप असे या महिलेचे नाव असून, ती बडतर्फ अंगणवाडी सेविका आहे. याच प्रकारच्या गुन्ह्यात दोषी ठरली आहे. सध्या ती जामिनावर तुरुंगाबाहेर असताना तिने पुन्हा गर्भलिंगनिदान व गर्भपाताचा गोरख धंदा चालवला होता.अशी केली कारवाईजिल्हा शल्य चिकित्सक आणि पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणी बैठक घेऊन कारवाईचे नियोजन केले. त्यानुसार एक बनावट रुग्ण संबंधित महिलेकडे पाठविण्यात आली. गुरुवारी सकाळी सहा वाजता या बनावट रुग्णाची गर्भलिंग तपासणी सुरू असताना छापा टाकून सर्वांना ताब्यात घेण्यात आले. त्यामध्ये मनीषा सानप, चंद्रकांत पांडुरंग चंदनशिव यांचा समावेश आहे. गर्भलिंग निदान करणारा डॉक्टर सतीश गवारे (रा. जालना) पळून गेला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/db1YVwf
No comments:
Post a Comment