नवी दिल्ली: म्यानमारमधील हिंसाचार सातत्याने वाढत आहे. बंडखोर आणि जुंटा-सरकार यांच्यात चकमकी सुरू असताना म्यानमार लष्कराचे शेकडो सैनिक भारतात पलायन करत आहेत. या घडामोडींबाबत मिझोराम सरकारने केंद्र सरकारला सावध केले असून म्यानमारच्या सैनिकांना लवकरात लवकर मायदेशी पाठवण्याचे आवाहन केले आहे. चकमकी वाढत असताना म्यानमार लष्कराचे सुमारे ६०० सैनिक भारतात दाखल झाले आहेत. त्यांनी मिझोराममधील लांगतलाई जिल्ह्यात आश्रय घेतला आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरकान आर्मी (एए) या वांशिक सशस्त्र गटाच्या अतिरेक्यांनी पश्चिम म्यानमारच्या राखीनमधील त्यांच्या तळांवर कब्जा केला आहे. तेथून पळालेल्या म्यानमारच्या सैनिकांना आसाम रायफल्सच्या कॅम्पमध्ये आश्रय देण्यात आला आहे. मिझोराममधील परिस्थिती पाहता मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी शिलाँगमध्ये झालेल्या ईशान्य परिषदेच्या बैठकीत गृहमंत्री अमित शहा यांच्याशी या विषयावर चर्चा केली. मिझोरामने राज्यात आश्रय घेतलेल्या म्यानमारच्या सैनिकांना लवकरात लवकर परत पाठवण्यावर भर दिला. वाढता तणाव आणि त्याचा राज्याच्या स्थैर्यावर होणार्या परिणामाबाबत मुख्यमंत्र्यांनी ही विनंती केली.मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी पत्रकारांना या संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, लोक आश्रय घेण्यासाठी म्यानमारमधून भारतात पळून येत आहेत. आम्ही त्यांना मानवतावादी दृष्टीने मदत करत आहोत. यापूर्वी अशा सैनिकांना विमानाने परत पाठवण्यात आले होते. आत्तापर्यंत सुमारे ४५० सैनिकांना परत पाठवण्यात आले आहे. सत्तापालटानंतर म्यानमार सध्या सर्वात मोठ्या परीक्षेला सामोरे जात आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या उत्तरार्धात जातीय अल्पसंख्याकांनी हल्ले करून काही मशिदी आणि लष्करी चौक्या ताब्यात घेतल्या होत्या.केंद्र सरकार लवकरच भारत आणि म्यानमार यांच्यातील १,६४३ किमी सीमेवर कुंपण घालणार आहे. भारत लवकरच शेजारील देशासोबतचा फ्री मूव्हमेंट रेजीम (FMR) करार संपविण्याचा विचार करेल, असे गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी सांगितले. या करारानुसार भारताच्या पूर्व सीमेवर राहणाऱ्या दोन्ही देशांतील रहिवाशांना व्हिसाशिवाय एकमेकांच्या प्रदेशात १६ किमीपर्यंत प्रवास करण्याची परवानगी दिली होती. हा करार संपल्यास या हालचालींवर मर्यादा येतील. गुवाहाटी येथे आसाम पोलिसांच्या पासिंग आऊट परेडदरम्यान बोलताना शहा बोलत होते. दरम्यान, बांगलादेशच्या ४,०९६ किमीच्या सीमेवर अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी दुहेरी कुंपण घालण्यात आले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/PRO0Xmy
No comments:
Post a Comment