Breaking

Monday, January 22, 2024

दारु पिण्यासाठी पत्नीची पैशांची मागणी; नकार दिल्यानं छळ, कंटाळून पतीचं धक्कादायक कृत्य https://ift.tt/2A3BHKo

पिंपरी: पत्नीने दारू पिण्यासाठी पतीकडे वारंवार पैशांची मागणी केली. यात पत्नीच्या बहिणीनेही तिला साथ दिली. शेवटी पत्नी आणि मेव्हणीच्या छळाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी विवाहिता आणि तिच्या बहिणीला पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, नारायण मधुकर निर्वळ (३५), असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. ज्ञानेश्वर मधुकर निर्वळ (३९) यांनी शनिवारी (२० जानेवारी) देहूरोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नारायण निर्वळ यांची पत्नी आणि तिची बहीण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून दोघींना अटक केली आहे. नारायण निर्वळ हे ॲनिमेशन क्षेत्रात कार्यरत होते. काही मित्रांसोबत मिळून ते ॲनिमेशनचा व्यवसाय करीत होते. त्यांच्या पत्नीला काही दिवसांपूर्वी वर्क फ्रॉम होम मिळाले होते. दरम्यान, नारायण यांची पत्नी आणि तिच्या बहिणीने नारायण यांच्याकडे दारू पिण्यास पैशांची मागणी केली. त्यांनी नकार दिला असता भांडण करून मानसिक व शारीरिक त्रास दिला. या प्रकाराला कंटाळून नारायण यांनी १७ जानेवारीला राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात शनिवारी (२० जानेवारी) शवविच्छेदन झाले. दरम्यान नारायण निर्वळ यांनी मानसिक, शारीरिक त्रास होत असल्याबाबत भाऊ ज्ञानेश्वर निर्वळ यांना फोनवरून मेसेज केले होते. त्यावरून ज्ञानेश्वर यांनी पोलिसांकडे तक्रार केली. नारायण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नारायण यांची पत्नी आणि तिच्या बहिणीला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालायने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस उपनिरीक्षक सोहन धोत्रे तपास करत आहेत. नारायण निर्वळ यांचा ॲनिमेशन क्षेत्रात हातखंडा होता. काही जणांसोबत ते भागीदारीमध्ये काम करीत होते. त्यासाठी एक छोटे कार्यालय थाटले होते. या कामाला मोठे स्वरूप देऊन स्वत:ची कंपनी सुरू करण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र, त्यांचे हे स्वप्न अर्धवटच राहिले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/P2Qxl0K

No comments:

Post a Comment