नवी दिल्ली : इंग्लंडचा क्रिकेटपटू शोएब बशिरला भारताचा व्हिसा न मिळाल्याने त्याला संघाबरोबर येता आले नाही. त्यानंतर इंग्लंडने कांगावा करायला सुरुवात केली होती. या सर्व गोष्टींंचा दोष भारतावर देण्यात येत होता. अखेर बशिरला बुधवारी व्हिसा मिळाला. पण या सर्व प्रक्रीयेमध्ये भारताची नव्हे तर इंग्लंडचीच कशी चूक होती, हे आता भारताचा माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसादने दाखवून दिले आहे.बशिर हा पाकिस्तानी वंशाचा खेळाडू इंग्लंडकडून खेळत आहे. इंग्लंडचा संघ हा संयुक्त अरब अमिरातीमार्गे भारतात दाखल झाला. पण या संघाबरोबर बशिरला येता आले नाही, कारण त्याला भारताचा व्हिसा मिळाला नव्हता. त्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंपासून ते पत्रकारांनी भारताला दोष द्यायला सुरुवात केली होती. एका पत्रकाराने तर सर्वासमोर रोहित शर्माला पत्रकार परिषदेमध्येच बशिरच्या व्हिसाबाबत प्रश्न विचारला होता. यानंतर रोहितने, मी काही व्हिसाच्या कार्यालयात कामाला नाही, त्यामुळे मी याबाबत तुम्हाला अपडेट्स देऊ शकत नाही, असे म्हणत एका वाक्यात चांगलाच समाचार घेतला होता. या प्रकरणात आता वेंकटेश प्रसादने उडी घेतली आहे. प्रसादने यावेळी सांगितले की, " बशिरच्या पासपोर्टवर इंग्लंडमध्येच व्हिसाचा स्टॅम मारणे गरजेचे होते. पण इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने त्याला संयुक्त अरब अमिरातीला पाठवले. तिसऱ्या देशातच त्याच्या पासपोर्टवर व्हिसा स्टॅम्प करण्यात येईल, असे त्यांच्या क्रिकेट मंडळाला वाटले. पण या सर्व प्रक्रीयेमध्ये जी साधी नियमावली असते, तीच त्यांना पाळली नाही आणि त्यांनी काही गोष्टी गृहीत धरल्या, त्यामुळेच ही समस्या समोर आली. कोणत्याही गोष्टीवर रडत राहण्याची त्यांची पद्धतच आहे. या सर्व प्रकरणात जर कोणी दोषी असेल तर ते म्हणजे इंग्लंडचे क्रिकेट मंडळ."इंग्लंडच्या क्रिकेट संघटनेने व्हिसाबाबत काही गोष्टी गृहीत धरल्या आणि त्यांनी साध्या नियमांचे पालन केले नाही. पण या सर्व गोष्टींचा दोष ते भारताला देत राहीले. पण यामध्ये खरी चूक ही इंग्लंडच्या क्रिकेट संघटनेचीच होती, असे वेंकटेश प्रसादने स्पष्ट केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/nbEZHKO
No comments:
Post a Comment