म. टा. प्रतिनिधी, पुणे : लोकसभा निवडणुकांपूर्वी तीन वर्षांहून अधिक काळ एका ठिकाणी काम करणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जाण्याची शक्यता असल्याने पुण्यातील कारभार कोणाकडे जाणार, ही चर्चा आता रंगू लागली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांच्या बदलीची सर्वाधिक चर्चा असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पुण्यातील बैठकीत थेट विचारणा केल्याने त्यांना पुण्यात संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना मुख्यमंत्र्यांची पसंती असून, अजितदादांच्या ‘गुडबुक’मधील क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांच्यासह आणखी काही अधिकाऱ्यांच्या नावाची जिल्हाधिकारीपदासाठी चर्चा आहे.जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांना कार्यकाळापेक्षा अधिक काळ काम करण्यास संधी मिळाली आहे. ते सचिवपदासाठी पात्र असल्याने त्यांची बदली कोठे होणार याची उत्सुकता आहे. राज्यस्तरीय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना अजितदादांनी ‘येता का पुण्याला,’ म्हणून विचारणा केली. तेव्हापासून डुडी यांचे नाव पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी चर्चेत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या नावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पसंती असल्याने त्यांचे नाव चर्चेत आले आहे, तर राज्याचे क्रीडा आयुक्त म्हणून काम करणारे डॉ. सुहास दिवसे यांचेही नाव जिल्हाधिकारीपदासाठी चर्चेत आहे. ते अजितदादांच्या ‘गुडबुक’मधील आहेत.याशिवाय ‘सिडको’चे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, कोकण विभागीय आयुक्तालयातील अपर आयुक्तावरून नव्या पदाच्या प्रतीक्षेत असलेले किसन जावळे, नोंदणी मुद्रांक महानिरीक्षक हिरालाल सोनवणे यांचीही नावे चर्चेत आहेत. त्यामुळे पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.सोमवारनंतर बदल्यांचे आदेश जारी?मार्चमध्ये लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या निकषानुसार, पुण्यात तीन वर्षांपेक्षा अधिक काळ नोकरी केलेल्या ‘आयएएस’ अधिकाऱ्यांची पुण्याबाहेर बदली होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्यामध्ये पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार; तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा समावेश आहे. डॉ. देशमुख पुण्याबाहेरील शहराच्या महापालिका आयुक्तपदी नियुक्त होण्याचीही चर्चा आहे, तर विक्रमकुमार यांना कोठे संधी मिळणार याची उत्सुकता आहे. येत्या सोमवारनंतर जिल्हाधिकारीपदासह अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी होण्याची शक्यता जाणकारांनी वर्तविली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/DJlxMkh
No comments:
Post a Comment