दिगंबर शिंगोटे : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने गुरुवारी इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत १३१ धावांची खेळी केली. यासह रोहितने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला. हे करताना त्याने ७३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करताना भारताची ३ बाद ३३ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर रोहितने कर्णधाराला साजेशी खेळी केली. त्याने रवींद्र जडेजाच्या साथीने द्विशतकी भागीदारी रचली आणि भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढले. हे करत असताना रोहितने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. तो कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा भारताचा सर्वाधिक वयाचा (३६ वर्षे व २९१ दिवस) कर्णधार ठरला आहे. याबाबतीत रोहितने माजी कर्णधार विजय हजारेंना (३६ वर्षे व २७८ दिवस) मागे टाकले. विजय हजारे यांनी १९५१मध्ये इंग्लंडविरुद्धच कसोटी शतक झळकावले होते.कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकारांच्या बाबतीत रोहितने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला मागे टाकले. गुरुवारी १३१ धावांच्या खेळीत रोहितने तीन षटकार लगावले. यासह रोहितने आतापर्यंत एकूण ८० षटकार लगावले आहे. धोनीने ७८ षटकार लगावले आहेत. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवागने सर्वाधिक ९० षटकार ठोकले आहेत. रोहितने आणखी एका बाबतीत माजी कर्णधार धोनीला मागे टाकले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या भारतीय कर्णधारांत रोहित आता अव्वल स्थानी आहे. त्याने आतापर्यंत २१२ षटकार ठोकले आहेत. कर्णधारपदी असताना धोनीने एकूण २११ षटकार ठोकले होते. कर्णधारपदी असताना सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम इंग्लंडच्या इऑन मॉर्गनच्या (२३३) नावे आहे. त्यामुळे आता या मालिकेत रोहित शर्माला इऑन मॉर्गनचा विक्रमही मोडता येऊ शकतो. त्यामुळे आता यापुढे रोहित शर्मा कशी फलंदाजी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिसरी कसोटी राजकोट येथे सुरू आहे. भारताने रोहित शर्माच्या शतकाच्या जोरावर तिसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी सामन्यावर मजबूत पकड बनवली आहे. त्यामुळे आता या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी काय होणार, याची उत्सुकता सर्वांना लागलेली असेल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/RKCkoWM
No comments:
Post a Comment