म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्यातील दुर्गम ठिकाणची पर्यटनस्थळे, प्राचीन मंदिरे, गडकिल्ले यांच्यापर्यंत सर्व वयोगटांतील नागरिकांना पोहोचता यावे यासाठी रोप-वेंची उभारणी करण्यात येणार आहे. राज्यातील ४० ठिकाणी रोप-वे उभारणी तयारी सुरू असून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी दिले. तसेच, राज्यातील ८१ रस्ता प्रकल्पांच्या कामासाठी १६०० कोटी रुपये मंजूर करण्यात येतील, अशी घोषणाही त्यांनी केली.भारतीय राजमार्ग अभियंता अकादमी आणि राज्य शासनाचा नगरविकास विभाग यांच्या दरम्यान राज्यातील सहा शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय सुचविण्यासाठी आणि राष्ट्रीय राजमार्ग वाहतूक व्यवस्थापन कंपनी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात रोप-वे उभारणीबाबत शनिवारी दुपारी सह्याद्री अतिथिगृह येथे सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. बैठकीला नितीन गडकरी, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.रोपवेच्या उभारणीसाठी राज्यातून ४० प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यापैकी सहा ठिकाणच्या प्रकल्पांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पांसाठी आवश्यक असणारा निधी केंद्र सरकार देईल. राज्य शासनाने प्रकल्पांसाठी आवश्यक असणारी जमीन उपलब्ध करुन द्यावी, असे गडकरी म्हणाले. शहरातील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी अभियंता अकादमीच्या माध्यमातून अभ्यास होऊन वाहतूक सुलभ होऊन अपघात कमी होण्यास मदत होईल, अशी पुस्ती त्यांनी जोडली. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या शहरातील वाहतूक कोंडीचा अभ्यास करुन उपाययोजना सुचविल्या जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.मुंबई-गोवा मार्गाचा आढावामुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग संदर्भातील आढावा बैठकही शनिवारी झाली. यावेळी सर्व अपूर्ण कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून संबंधित शेतकऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला देण्यात यावा, सर्व कायदेशीर प्रकिया पूर्ण करण्यात याव्यात, असेही निर्देश गडकरी आणि चव्हाण यांनी दिले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/6ImC1al
No comments:
Post a Comment