पुणे: मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी सुरू करण्यात आलेले मराठा तसेच खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण आज, शुक्रवारपर्यंत संपण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच पुणे, सोलापूर, मुंबई, तसेच अन्य काही जिल्ह्यांनी राज्य सरकारकडे शनिवार, रविवार दोन दिवसांची मुदतवाढ मागितली आहे. मात्र, सरकारने याबाबत थेट आयोगालाच पत्र व्यवहार करण्याची सूचना केली आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांसह महापालिका हद्दीत सुरू असलेल्या सर्वेक्षणाबाबत विभागनिहाय बैठक घेतली. त्या बैठकीत सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसेच महापालिकांचे आयुक्त, नोडल ऑफिसर उपस्थित होते. विभागानुसार, सहसचिवांनी आढावा घेतला. तसेच सर्वेक्षणादरम्यान काही तक्रारी असल्यास कळवा अशा सूचना करण्यात आल्या. पुणे विभागातील पुणे, सोलापूर या महापालिकांच्या प्रतिनिधींनी शनिवारी, रविवारी सुट्टी असल्याने दोन दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली. त्यावेळी मुंबईसह अन्य काही जिल्ह्यांनी सुद्धा या मागणीचा आधार त्यांच्या जिल्ह्यासंह महापालिका हद्दीत सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आल्याचे सांगितले. मात्र, आज, शुक्रवारी दुपारपर्यंत १०० टक्के सर्वेक्षण पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवार या दोन दिवसांची मुदतवाढ दिल्यास शंभर टक्के सर्वेक्षण पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही अनेक महापालिकांच्या आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. ‘शुक्रवार दुपारपर्यंत काही अडचणी असल्यास सरकारला कळवा. मुदतवाढ हवी असल्यास थेट आयोगाला पत्र व्यवहार करावा,’ अशा सूचना सरकारने दिल्या आहेत. पुणे विभागात ८० टक्के सर्वेक्षण पुणे विभागात सांगली जिल्ह्यात सर्वाधिक ९१ टक्के तर जिल्ह्यातील मिरज- कुपवाड महापालिकेत ६३ टक्के सर्वेक्षण झाले आहे. पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात ८५ टक्के, पुणे महापालिका ७४ टक्के, पिंपरी चिंचवडमध्ये ८३ टक्के इतके सर्वेक्षण झाले आहे. सातारा जिल्हा ७३ टक्के, तसेच सोलापूर जिल्हा ८० टक्के आणि सोलापूर महापालिकेत ६० टक्के इतके सर्वेक्षण झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ८५ टक्के तसेच, कोल्हापूर महापालिकेत ७२ आणि इचलकरंजी महापालिकेत ८८ टक्के सर्वेक्षण झाले आहे, अशी माहिती पुणे विभागीय आय़ुक्तालयातून देण्यात आली. पुण्यात सर्वेक्षण पूर्ण होणारसर्वेक्षण पूर्ण झालेल्या प्रगणकांना इतर ठिकाणी काम देण्याचे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. त्याबाबत पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम म्हणाल्या, ‘काही तालुक्यांतील गावांमध्ये सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यानुसार जिल्ह्यातही एका तालुक्यातील ज्या प्रगणकांचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे, अशा प्रगणकांना त्याच तालुक्यातील अन्य गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम देण्यात येणार आहे. तांत्रिक अडचणींमुळे येथील प्रगणकांची नोंदणी उशिरा झाली. त्यामुळे, सर्वेक्षणाला काहीसा विलंब झाला. मात्र, तालुक्यात बहुतांश घरे तसेच सोसायटीत ‘सेकंड होम’ असल्याने अनेक घरे बंद आहेत. अशा घरांची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी तालुक्यातील सर्वेक्षण पूर्ण होईल.’
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/m3aBy80
No comments:
Post a Comment