म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: केंद्रीय राखीव पोलिस दलात (सीआरपीएफ) प्रतिनियुक्तीवर असलेल्या ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची जानेवारी महिन्यात राज्याच्या पोलिस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली. नियमानुसार रश्मी शुक्ला या जून २०२४मध्ये सेवानिवृत्त होत आहेत. मात्र महासंचालक पदावधी दोन वर्षांचा असल्याने शुक्ला या जानेवारी २०२६पर्यंत महासंचालक म्हणून कायम राहतील, असा आदेश मंगळवारी राज्य शासनाच्या गृह विभागाने जारी केला. आयपीएस अधिकारी रजनीश शेठ हे सेवानिवृत्त झाल्यानंतर, ४ जानेवारी २०२४ रोजी पोलिस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. शुक्ला यांनी ९ जानेवारीला राज्याच्या कुलाबा येथील पोलिस मुख्यालयात पदभार स्वीकारला. भारतीय पोलिस सेवेतील कालावधी आणि वयोमानानुसार शुक्ला या जून २०२४मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. मात्र राज्य सरकारला आपल्या विशेषाधिकाराचा वापर करून केंद्र सरकारच्या संमतीनुसार अधिकाऱ्यांचा कालावधी आवश्यकतेनुसार तीन, सहा महिने वाढवता येईल, अशी तरतूद आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाने रश्मी शुक्ला यांच्या महासंचालक पदावरील कालावधीबाबत मंगळवारी आदेश जारी केला. सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानुसार, पोलिस महासंचालक पदावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचा पदावधी हा सेवानिवृत्तीची तारीख कोणतीही असली तरी दोन वर्षांचा आहे. हे नमूद करताना १९८८च्या तुकडीच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या नियुक्तीच्या कालावधीपासून पुढील दोन वर्षांसाठी म्हणजेच, ३ जानेवारी २०२६पर्यंत महासंचालक पदावर कायम राहतील, असे आदेशात म्हटले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/F30iUO1
No comments:
Post a Comment