वृत्तसंस्था, चंडीगड: शेतमालाच्या खरेदीसाठी किमान आधारभूत किंमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी व इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागले. पंजाब आणि हरयाणादरम्यान असलेल्या खनौरी सीमेवर उसळलेल्या संघर्षात एका शेतकरी आंदोलकाचा मृत्यू झाला, तर १२ पोलिस जखमी झाले आहेत.शेतकरी आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी तीन केंद्रीय मंत्र्यांच्या समितीसोबत रविवारी रात्री पार पडलेली चर्चेची चौथी फेरी अयशस्वी ठरली होती. त्यानंतर दोन दिवस शांत राहिल्यानंतर खनौरी आणि शंभू सीमेवरील शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळीच पुन्हा आंदोलन सुरू केले. राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच करण्यासाठी बॅरिकेडच्या दिशेने सरकणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हरयाणा पोलिसांनी या दोन्ही सीमांवर अनेकदा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. खनौरी येथे अश्रुधुराच्या माऱ्यामुळे काहीसा गोंधळ उडाला. धुरापासून बचावासाठी शेतकऱ्यांची पळापळ झाली. अनेक आंदोलकांनी मास्क, तसेच चष्म्यांचा वापर केल्याचेही दिसून आले.खनौरी सीमेवरील संघर्षात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव सुभकरण सिंग (२१) असे असून, तो पंजाबच्या भटिंडा जिल्ह्यातील बालोके गावचा रहिवासी असल्याची माहिती शेतकरी नेते बलदेवसिंग सिरसा यांनी दिली. 'पतियाळा येथील राजेंद्र रुग्णालयात खनौरी येथून तिघांना आणण्यात आले, यातील एकाचा आधीच मृत्यू झाला होता. मृताच्या डोक्याला जखम झाली होती, तर अन्य दोघांची प्रकृती स्थिर आहे', असे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक एच. एस. रेखी यांनी सांगितले.हरयाणा पोलिसांनी अश्रुधुराच्या जोडीलाच रबरी गोळ्यांचाही मारा केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. तर, पोलिसांवर काठ्या आणि दगडांनी केलेल्या हल्ल्यामध्ये १२ पोलिस जखमी झाल्याचे हरयाणा पोलिस दलातील एका अधिकाऱ्याने सांगितले. तत्पूर्वी, बुधवारी सकाळी शेतकऱ्यांशी चर्चा करणाऱ्या तीन मंत्र्यांपैकी कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन करत, पुढील चर्चेसाठी आमंत्रित केले.'एमएसपी' आणि पीककर्ज माफी यांसह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी १३ फेब्रुवारीपासून 'दिल्ली चलो' आंदोलन सुरू केले आहे. संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा यांच्या या आंदोलनात खनौरी आणि शंभू सीमेवर हजारो शेतकरी ट्रॅक्टर ट्रॉली आणि ट्रकसह तळ ठोकून आहेत. तूर्त दोन दिवसांसाठी आंदोलन स्थगित करण्यात आले असले, तरी हजारो शेतकरी या दोन्ही सीमांवर तळ ठोकून राहणार आहेत.
आंदोलन दोन दिवस स्थगित
आंदोलक शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर शेतकरी नेत्यांनी 'दिल्ली चलो' आंदोलन दोन दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. आंदोलनाची पुढील दिशा शुक्रवारी संध्याकाळी जाहीर करण्यात येईल, असे शेतकरी नेते सरवनसिंग पंधेर यांनी सांगितले.... तर राजकारण्यांना गावबंदी
मीरत/बागपत : 'सरकारने शेतकऱ्यांना दिल्लीला जाण्यापासून अडवले, तर निवडणुकांदरम्यान शेतकरी राजकीय नेत्यांना गावांमध्ये प्रवेश करू देणार नाहीत,' असा इशारा भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी बुधवारी दिला. 'एमएसपी' तसेच २०२०-२१च्या आंदोलनातील शेतकऱ्यांवरील फौजदारी गुन्हे मागे घ्यावेत, या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी मीरत येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर रॅली काढली. त्यावेळी ते बोलत होते.\Rअडथळे हटवा; पोलिसांचा इशारा
आंदोलनस्थळी जेसीबी, एक्सकव्हेटर्ससह अवजड वाहनेही आहेत. संबंधित वाहनांच्या मालकांनी ती आंदोलकांना देऊ नयेत व दिली असल्यास ती तातडीने मागे घ्यावीत. त्यामुळे सुरक्षा जवान जखमी होण्याची भीती आहे. हा अजामीनपात्र गुन्हा असून, संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा हरयाणा पोलिसांनी 'एक्स'वर बुधवारी सकाळी दिला. या अवजड वाहनांचा वापर बॅरिकेड तोडण्यासाठी केला जाण्याची शक्यता व्यक्त करत, ती ताब्यात देण्याची विनंती हरयाणा पोलिसांनी पंजाब पोलिसांना केली.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/RlAkaOV
No comments:
Post a Comment