म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुण्याला मुळशी धरणातून अतिरिक्त पाणी उपलब्ध करण्याची अनेक वर्षांपासूनची शक्यता आता प्रत्यक्षात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वाढत्या लोकसंख्येसाठी पिण्याच्या पाण्याची गरज पाहता पुढील ३० वर्षांचा विचार करून मुळशी धरणाची उंची एक मीटरने वाढवा, असा आदेश उपमुख्यमंत्री यांनी बुधवारी दिला.धरणाची उंची वाढल्यास मुळशी आणि पुण्याच्या परिसराला अतिरिक्त पाणी उपलब्ध होऊ शकते; तसेच धरणाच्या मृतसाठ्याचा पाण्याचा वापर करता आल्यास पाण्याची वाढीव मागणी पूर्ण होऊ शकणार आहे. मुळशी धरणाखालील मुळशी परिसरातील गावांसह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रातील पश्चिम भागातील वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली. त्या वेळी मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या टप्पा क्रमांक एक आणि दोन या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. त्या वेळी बैठकीला वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र रहाणे, टाटा पॉवर कंपनीचे अधिकारी प्रभाकर काळे आदी उपस्थित होते. पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, 'पीएमआरडीए'चे आयुक्त राहुल रंजन महिवाल दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
धरणाची एक मीटरने उंची वाढवा
मुळशी धरणाच्या टप्पा एकमध्ये धरणाची उंची सुमारे एक मीटरने वाढविण्यास टाटा कंपनीने तत्त्वतः होकार दिला. त्या संदर्भातील प्रस्ताव जलसंपदा विभाग टाटा कंपनीला देणार आहे. मुळशी धरणाची उंची वाढवल्यानंतर निर्माण होणाऱ्या पाण्याच्या फुगवट्यामुळे काही जमीन पाण्याखाली येण्याची शक्यता आहे. धरणाची उंची वाढविल्यामुळे पाण्याखाली येणारी ८० टक्के जमीन ही टाटा कंपनीच्या मालकीची असून, उर्वरित २० टक्के जमीन शेतकऱ्यांची आहे. ही जमीन संपादित करण्यासाठी सरकार मदत करील. संबंधित शेतकऱ्यांना चांगला मोबादला द्यावा, अशी सूचनाही पवार यांनी टाटा कंपनीला केली. याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.दरम्यान, मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या टप्पा एक आणि दोनच्या माध्यमातून होणाऱ्या कामांसाठी टाटा पॉवर कंपनीबरोबर सामंजस्याने उपाययोजनांवर अंमलबजावणी करावी. टाटा पॉवर कंपनीच्या सहकार्याने या कामांना प्राधान्य द्या, असेही आदेश पवार यांनी दिले. धरणाची एक मीटर उंची वाढल्यास उपलब्ध होणारे अतिरिक्त पाणी पुणे शहराला मिळण्याची शक्यता आहे.जलशुद्धीकरणासाठी चार एकर जागा
मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत मंजूर कामाबाबत टाटा पॉवर कंपनीने हरकत घेतल्याने काम थांबले होते. त्या कामांना वेग देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जलसंपदा विभागास प्रस्ताव द्यावा. जलसंपदा विभागाने आवश्यक पाण्याचे आरक्षण जाहीर करून टाटा पॉवर कंपनीला लेखी कळवावे; तसेच पौड येथील पाणीपुरवठा योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी 'पीएमआरडीए'ने एक एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी पुरेशा क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी शेजारी असणाऱ्या आणखी चार एकर जागेची आवश्यकता आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्याने 'पीएमआरडीए'ने ही जागा अधिग्रहण करून उपलब्ध करून घ्यावी, असा आदेश पवार यांनी दिला आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/fNQlo1q
No comments:
Post a Comment